उद्धव ठाकरे यांनी तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणामाला तयार राहावे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा
अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला. ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मधु चव्हाण , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , सह मुख्य प्रवक्ते अजीत चव्हाण, राम कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले की , नेमके फडतूस कोण हे राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात पाहिले आहे. कार्यतत्पर ,धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र याखेरीज दुसरी ओळखच नसलेल्या कर्तृत्वशून्य उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशोभनीय भाषेत टीका करू नये. अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील.
सत्ता गेल्याच्या नैराश्यातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाबद्दल असूया असल्यानेच उद्धव ठाकरे खालच्या पातळीवर जाऊन असभ्य शब्दांत टीका करत आहेत. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही .२०१९ मध्ये भाजपाच्या आधारावर ज्यांचे आमदार निवडून आले त्याच भाजपाला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्ववादाला सोडचिट्ठी दिली. मुख्यमंत्री असताना राज्याला अधोगतीकडे नेणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यासारख्या पोलीस अधिकाऱ्याला संरक्षण दिले , देशद्रोही शक्तींशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांना पाठीशी घातले , असेही श्री . राणे म्हणाले.