हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची , मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली , अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार या डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकास कामांना गती मिळाल्याचे पाहून बावचळलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांच्या नावाने शिव्याशाप देऊन आपली निराशा व्यक्त केली, असेही त्यांनी सांगितले.
श्री. बावनकुळे म्हणाले की, सत्तेवर आल्या आल्या उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याशी बेईमानी केली. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत असताना मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी वॉटर ग्रीडची योजना तयार करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ही मराठवाड्याच्या विकासाला वेगळे वळण देणारी वॉटर ग्रीड योजना रद्द केली. विदर्भ – मराठवाड्याच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महामंडळांची मुदत संपल्यावर या महामंडळांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुदतवाढ दिली गेली नाही . राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा विषय संपवा मग वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ, अशी भाषा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना वापरली होती. आता हीच मंडळी मराठवाड्याच्या विकासाच्या नावाने गळा काढताहेत.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पीक विमा योजनेचा बट्ट्याबोळ करून शेतकऱ्यांचे नुकसान केले गेले. शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना अवघ्या एका रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर नामांतर निर्णय मोदी सरकारने घेतला, मात्र खोटेनाटे सांगून महाविकास आघाडी सरकार त्याचे श्रेय लाटत आहे. संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांना महत्वाचे स्थान होते. त्यांच्यासाठीची खुर्चीही वेगळी होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना या सभेच्या व्यासपीठावर दुय्यम स्थान दिले गेले होते. महाविकास आघाडीतील मतभेद या सभेवेळी स्पष्टपणे दिसून आले, असेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले.