बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईलव्हिडीओ
Trending

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते उद्या भूमीपूजन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य विकास मंत्री, पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित होणार कार्यक्रम

मुंबई,

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे उद्या सोमवारी २७ मार्च २०२३ रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

उद्या सकाळी ११ वाजता प्लॉट नं. ३०५ / ३०६, फॉरेस्ट कॉलनी रोड, पनवेल येथे हा कार्यक्रम होईल.

राज्यातील युवक- युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरुपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करुन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार कौशल्य शिक्षण देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून कौशल्य विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण उपलब्ध करण्याकरिता ५ कौशल्य प्रशालांची (Schools) व त्याअंतर्गत अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली असून या अभ्यासक्रमांचा शुभारंभ राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आला आहे.

कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय सध्या तात्पुरत्या स्वरुपात एलफिस्टन तांत्रिक महाविद्यालय, मुंबई येथे सुरु करण्यात आले आहे. शासनपत्र दिनांक २५ जानेवारी २०२३ अन्वये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथील १० एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांचे एकत्रित बांधकाम (Integrated Campus) करण्याचे प्रस्तावित आहे. हा परिसर ग्रीन कॅंपस तसेच नेट झीरो अशा पद्धतीचा असेल. पर्यावरणपुरक इमारत बांधकाम करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button