राहुल गांधींची खासदारकी रद्द करून मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला- नसीम खान
मोदींच्या दडपशाहीला काँग्रेस भीत नाही, अत्याचारी भाजपला जनताच धडा शिकवेल.
मुंबई,
दि. २४ मार्च २०२३
काँग्रेसचे नेते मा. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करून केंद्रातील मोदी सरकारने देशात लोकशाही नाही हे दाखवून दिले आहे. एका खोट्या प्रकरणाचा आधार घेऊन राहुल गांधी यांच्यावर २४ तासाच्या आत कारवाई करण्याची मोदी सरकारला घाई का झाली होती? हा निर्णय घेऊन मोदी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नसीम खान म्हणाले की, राहुल गांधी यांची लोकप्रियता देशभर वाढत आहे. जनतेच्या प्रश्नांना ते वाचा फोडत आहेत. महिला, तरुणवर्ग, बेरोजगार, छोटे व्यापारी, शेतकरी, कष्टकरी यांना राहुल गांधी यांच्यामध्ये आशेचा किरण दिसत आहे. भारत जोडो यात्रेत त्याचा अनुभव आला असून भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता सहन झाली नाही. नरेंद्र मोदींना थेट भिडणारा निडर नेता म्हणून देशात राहुल गांधी यांची प्रतिमा तयार झाली आहे. अदानी उद्योग समुहातील महाघोटाळ्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत जाब विचारला होता. अदानी-मोदी संबंध काय आहेत, हा प्रश्न मोदींच्या जिव्हारी लागला असून त्याच सुडबुद्धीतून मोदी सरकारने राहुल गांधी यांना लक्ष्य केले.
राहुल गांधींचा आवाज ईडीच्या माध्यमातून बंद करण्याचा प्रयत्न करुन पाहिला पण त्यात मोदी सरकारला यश आले नाही. राहुल गांधी हे सत्य बोलत आहेत त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली आहे. परंतु अशा कारवायांना काँग्रेस पक्ष भिक घालत नाही. मोदी सरकारच्या या अत्याचाराला जनताही कंटाळली असून भापजाला जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे.