सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालून चुकीचे पायंडे पाडू नका;
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल
मुंबई,
दि. २३ मार्च –
विधीमंडळाच्या सभागृहाचे कामकाज प्रथा, परंपरा व नियमाला धरुन चालावे यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार कायम आग्रही असतात. आज राज्याचे एक मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने प्रश्न राखून ठेवण्याची वेळ विधानसभेच्या सभागृहात आल्यावर अजित पवार चांगलेच संतप्त झाले. विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच मंत्र्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, चुकीचे पायंडे पाडून सभागृहाच्या सार्वभौमत्वावर घाला घालू नका अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले.
राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे विधानसभेत आज प्रश्न क्रमांक दोन राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. या गोष्टी सभागृहात वारंवार घडत आहेत. सभागृहाच्या प्रथा, परपंरा पायदळी तुडविण्याचे काम सुरु आहे. मंत्र्यांच्या अनुपस्थितीने प्रश्न राखून ठेवण्याचे समर्थन करता येणार नाही. विधीमंडळाच्या इतिहासात मंत्री बैठकीत व्यस्त असल्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न राखून ठेवल्याचे यापूर्वी एकही उदाहरण नाही. त्यामुळे विधीमंडळ सुरु असताना विधीमंडळाच्या कामकाजालाच सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, सभागृहात चुकीचे पायंडे पाडता कामा नये, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारचा समाचार घेतला.