मुंबईतील मराठी टक्का घटवणाऱ्यांची चौकशी करा
आमदार अतुल भातखळकर यांची मागणी
मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमधील सुमारे 2,051 पदे गेल्या तीन-चार वर्षांपासून रिक्त आहेत. मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे ? याची चौकशी करून रिक्त जागा भरण्याबाबत शासनाने निवेदन करावे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आज सभागृहात केली.
यावेळी बोलताना आमदार भातखळकर म्हणाले मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांमध्ये 3,213 पदे मंजूर आहेत. 2,051 पदे रिक्त आहेत. मुंबईतील मराठी टक्का घसरतोय. मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून पब्लिक स्कूलच्या नावाखाली इंग्रजी माध्यमातील शाळा चालू करण्याचा निर्णय गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात घेण्यात आला आहे.
हे सरकार मराठीला प्राधान्य देणार आहे. सरकार सत्तेत आल्यावर मराठीचे राज्यगीत अधिकृत करण्यात आले. हे गीत आता सर्वत्र म्हणायलाही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मराठी टक्का घटवण्याच्या मागे कोण आहे, याची चौकशी केली पाहिजे तसेच या रिक्त जागा भरण्याबाबत सरकारने निवेदन करावे, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली.