प्रकल्पग्रस्त शेतक-यांस केलेल्या भूखंडांचे वाटप आणि प्रतीक्षा यादी सिडकोकडे अद्ययावत नाही
नवी मुंबई विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्ताला सिडकोकडून मिळणारा मोबदला निश्चित करण्यासाठी लाच मागणाऱ्या सिडकोच्या क्षेत्र अधिकाऱ्यावर नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने नुकतीच कारवाई केली आहे. ही वस्तुस्थिती असताना सिडको तर्फे प्रकल्पग्रस्त शेतक-यांस केलेल्या भूखंडांचे वाटप आणि प्रतीक्षा यादी अद्ययावत नसल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीमुळे समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी सिडकोकडे अर्ज केला होता. या अर्जात अनिल गलगली यांनी सिडको अंतर्गत प्रकल्पग्रस्त शेतकरी यांस देण्यात आलेल्या भूखंडांची माहिती आणि आणि प्रतीक्षा यादीची मागितली होती. सिडकोचे सहाय्यक विकास अधिकारी श्रीकांत पावसकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की माहिती अधिकार अधिनियमान्वये वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करुन देणे अभिप्रेत आहे. या विभागात 12.5 टक्के योजनेतंर्गत वाटप करण्यात येणा-या भूखंडाची माहिती गावं निहाय संचिका क्रमांक नुसार ठेवण्यात आलेली आहे. संचिका क्रमांक आणि गाव याबाबत माहिती देत संचिका तपासणी करावी.
अनिल गलगली यांच्या मते नवी मुंबई विमानतळाचे काम झपाट्याने सुरु असून प्रकल्प बाधितांना सिडकोकडून भूखंड स्वरूपात मोबदला देण्याचे देखील काम सुरु आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्ताला संपादित घराच्या किंवा जमिनीच्या बदल्यात मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी आर्थिक व्यवहार केला जात आहे. माहिती अद्ययावत असल्यास सिडको अधिकारी यांस दिरंगाई का होते याचे उत्तर द्यावे लागेल. यामुळे सदर माहिती अद्ययावत नाही. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिडकोचे उपाध्यक्ष यांस पत्र पाठवून मागणी केली आहे की वाटप आणि प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी.