छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारचे मानले आभार
मुंबई,
दि. ९ मार्च –
राज्य सरकारच्यावतीने ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील बलिदान व समाधीस्थळाच्या कामाविषयी निवेदन करताना छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केला त्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे आभार मानले.
महाविकास आघाडी सरकारच्यावतीने गेल्या अर्थसंकल्पात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान व समाधीस्थळाच्या विकासासाठी २५६ कोटी निधी मंजूर केला होता. या बलिदान व समाधीस्थळाचा आराखडासुध्दा मंजूर करण्यात आला होता. या कामाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती, त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. यावर सर्वस्तरातून नाराजी व्यक्त होत होती. तसेच विरोधी पक्षाच्यावतीने हा प्रश्न सभागृहात मांडण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना महाविकास आघाडी सरकारच्यावतीने मंजूर केलेला आराखडा विद्यमान सरकारने काही अल्प बदल वगळता जशाचा-तसाच ठेवला असल्याचे सरकारच्यावतीने निवेदनाव्दारे सभागृहात माहिती देण्यात आली. यावेळी सरकारच्यावतीने निवेदन देताना पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराज केला.
छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे विशेष आभार मानले.