करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, नाना पटोले, राजन साळवी, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरु असून यामध्ये पोलीस उप अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली 16 जणांची एसआयटी टीम नेमली आहे. या प्रकरणाचा लवकरच तपास पूर्ण होईल.

पत्रकार बांधवांवर हल्ला ही बाब गंभीर आहे. राज्यातील प्रसार माध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच पत्रकार संरक्षण कायदा केलेला आहे. त्यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद कमी झाली आहे. परंतु कडक कार्यवाहीबाबत आवश्यक असेल तर या कायद्यात सुधारणा करण्यात येईल. या तपास प्रकरणात कोणताही हस्तक्षेत नाही किंवा पोलीसांवर दबाव नाही. यामध्ये पोलिस महासंचालक यांनी लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात येतील. राज्य शासनाकडून या पत्रकाराच्या कुटुंबाला 25 लाखांची आर्थिक मदत करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार असून सर्वात मोठा असा ग्रीन रिफायनरी प्रकल्प असणार आहे. यामध्ये 3 कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन राज्याच्या हितासाठी हा प्रकल्प करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button