गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक… पायर्यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी…
कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल
मुंबई
दि. २८ फेब्रुवारी –
सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा रे सरकार खोके सरकार… शेतकऱ्यांचा कांदा सरकारने केला वांदा… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राज्यातील कांदा उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळत नसल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाच्या माळा घालून महाविकास आघाडीचे आमदार शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.