हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे… कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे – अजित पवार
महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार...
शिवसेना पक्षासमोरच्या आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष उध्दव ठाकरे यांच्या व शिवसैनिकांच्या पाठीशी…
महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान व हीत जपण्यात हे सरकार सपशेल अपयशी…
मुंबई
पत्रकारांच्या अंगावर गाडी घालून हत्या होणार असेल, माजी मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना धमकी दिली जात असेल, खासदारांनाही मारण्याची सुपारी दिली जात असेल, एक ठाण्यातील अधिकारी अंडरवर्ल्डची धमकी देऊनही त्याला पाठीशी घातले जाते मग हे राज्य कुठल्या दिशेला जात आहे. कुठे आहे कायदा व सुव्यवस्था आहे असा संतप्त सवाल करतानाच अशा नामधारी आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहापानाला आमंत्रण दिले आहे परंतु त्यांच्या चहापानाला उपस्थित राहणे या कारणांमुळे आम्हाला योग्य वाटत नाही म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकला आहे अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आज विधीमंडळातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला कॉंग्रेसचे नेते रायपूर येथे शिबीर असल्याने उपस्थित राहिले नाहीत मात्र बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चर्चा करुन झालेल्या निर्णयाला पाठिंबा दिला अशी माहिती सुरुवातीलाच अजित पवार यांनी दिली.
या बैठकीमध्ये गेल्या अर्थसंकल्पात सरकारने किती योजना सांगितल्या त्यातील किती पूर्ण झाल्या आणि किती अपूर्ण राहिल्या आणि किती योजना सुरुच झाल्या नाहीत याचा आढावा घेतला. शिवाय राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडून या सर्व घटकांना दोन्ही सभागृहात कसा न्याय मिळवून देता येईल या व्यूहरचनेवर चर्चा झाली असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी सोलापूर येथील एक कांदा उत्पादक राजेंद्र चव्हाण यांनी ५१२ किलो कांदा विकला. मात्र त्याला फक्त दोन रूपयांचा चेक दिला गेला तोपण तीन आठवड्याने दिला. हे दुर्दैवी आहे ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही अवस्था आहे. असा प्रसंग कुठल्याही शेतकऱ्यांवर येऊ नये असे ठणकावून सांगतानाच आम्ही जर सत्तेत असतो तर त्या शेतकऱ्याचे कांदा निर्यात करण्याकरिता पाऊले उचलून ताबडतोब भाव वाढवून दिला असता असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी अजित पवार यांनी कांदा उत्पादकांना सरकारकडून किती किंमत दिली जातेय याचा पाढाच यावेळी वाचला.
राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. नागपूरचे अधिवेशन संपल्यानंतर आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी मिळाली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला झाला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. खासदार संजय राऊत यांना ठार मारण्याची धमकी मिळाली. पोलिसांनी चौकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला इतकं मारलं की त्याचा पोलीस ठाण्यातच मारहाणीत मृत्यू झाला आहे. हे गंभीर नाही का? एकीकडे शेतकरी उध्वस्त होत चालला आहे त्याला मदत होत नाहीय. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवालही अजित पवार यांनी व्यक्त केला.
कसबा आणि चिंचवड निवडणूकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तीन आणि चार दिवस त्याठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. रॅली काढत आहेत सभा घेत आहेत घ्या ना परंतु राज्याकडेही बघा ना असे खडेबोलही अजित पवार यांनी सुनावले.
शिवसेनेचे आमदार राजन साळवी, नितीन देशमुख, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ या नेत्यांना त्रास देण्याचे एकमेव काम सुरू आहे. निवडणूक आयोगाची स्वायत्तता टिकली पाहिजे, त्यांच्याबद्दल आदर राहिला पाहिजे परंतु तो टिकवण्यासाठी संबधित संस्थानी प्रयत्न केला पाहिजे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व चिन्हाबाबत घेतलेला निर्णय हा अक्षरशः पक्षपाती असल्याची जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयात निर्णय आल्यानंतरच आयोगाने निर्णय देणे योग्य ठरला असता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ४० आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले मग एखाद्या पक्षाचा एक किंवा दोन आमदार असतील तर ते एक किंवा दोन आमदार गेले. उदाहरणार्थ उद्या मनसेचे आमदार बोलले की पक्ष माझा चिन्ह माझे तर तुम्ही चिन्ह आणि पक्ष देणार आहात का? असा सवालही अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्या विरोधात राज्यात जनभावना तीव्र होत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर तर जनभावना अधिक संतप्त झाली आहे. चीड आहे, नाराजी आहे. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद बघितल्यानंतर विद्यमान शिंदे सरकार बेकायदा व घटनाबाह्य सरकार असल्याचे व अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान व हीत जपण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे असा थेट हल्लाबोलही अजित पवार यांनी यावेळी केला.
राज्यात गुंतवणूक येत नाही. मोठमोठे प्रकल्प काही लाख कोटींचे व काही लाख नोकर्यांचे इतर राज्यात गेले, लाखो रोजगार बुडाले, आर्थिक नुकसान झाले. त्या बदल्यात नवीन कुठलाही कारखाना आणू शकले नाहीत. मोठा प्रकल्प आणू सांगितले मात्र अजून मोठा प्रकल्प आला नाही. सत्तारुढ पक्षाचे खालपासून वरपर्यंतचे नेते सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. सत्ताधारी आमदार शिवीगाळ, मारहाण अधिकारीवर्गाला करत आहेत. विकासकामात राजकारण होत असल्याने विकासप्रक्रियेला फटका बसला आहे. एक महिना तीन दिवसाने आर्थिक वर्ष संपेल. जिल्हा वार्षिक योजनेतून किती पैसे खर्च झाले. अजिबात खर्च झाले नाहीत. मंजुरी नाही वर्कआर्डर नाही. याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. जिल्हा नियोजनमधील
ग्रामीण भागातील निधी खर्चाअभावी परत जाणार आहे. हिवाळी अधिवेशनात ५२ हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या मान्य केल्या परंतु तिजोरीचा विचार न करता मंत्री आणि त्यांच्या आमदारांच्या विभागात करोडो रुपयांची कामे देण्याच्या घोषणा केल्या परंतु तेवढा निधी द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही ही एक फसवणूक आहे असाही आरोप अजित पवार यांनी केला.
विकासकामांऐवजी इतर गोष्टींवर उधळपट्टी केली जात आहे. वर्षा बंगल्यातील खानपानाचे बिल दोन कोटी ३८ लाख रुपये आले आहे. चहात सोन्याचे पाणी टाकून पीत आहेत का? एवढेच नाही तर गेल्या आठ महिन्यात जाहिरातीवर ५० कोटी रुपये, मुंबई मनपाकडून माहिती घेतली तिथून १७ कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. तुमचे सगळे हसरे चेहरे दाखवण्याकरता ते पण नियमात जाहिराती देत नाही. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचाच फोटो हवा असे स्पष्ट निर्देश दिले आहेत परंतु तसे करतच नाही. त्यांना पाहिजे तसे फोटो देत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही. पगाराअभावी कर्मचाऱ्यांचे कुटुंब उपासमारीचा सामना करतंय मात्र सरकार एसटीचे कोट्यवधी रुपये खर्चून पानभर जाहिराती देत आहे. त्या जाहिराती देऊन एक वेगळया प्रकारचा स्वतःचा टेंभा मिरवण्याचे काम यांचे सुरू आहे या जाहिराती चीड आणणार्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या आहेत. करदात्यांच्या पैशातून होत असलेली उधळपट्टीचा यावेळी अजित पवार यांनी निषेध केला.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दोन वेळा उपोषणाला बसावे लागले. त्यांचे पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दिले आहे असे सांगायचे सोडून निवडणूक आयोग… निवडणूक आयोग असे मुख्यमंत्री सारखे बोलत सुटले त्यावर बोललो तर मी बोलतो अरे पण चुकीचे असेल तर त्यावर बोलणे माझे काम आहे असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. ठाण्यातील एक पालिका अधिकारी अंडरवर्ल्ड डॉनशी संबधित आहे इतका गंभीर आरोप असणार्यावर कारवाई होत नाही याबाबत तीव्र नाराजीही अजित पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणे हा राजकीय व सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मोठा गौरव असतो. मात्र या सरकारची कामगिरीच एकदम सुमार आहे. महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी अशी आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विश्वासघात करुन मराठी माणसाचा मानबिंदू शिवसेना फोडली त्यांचे चिन्ह तुम्ही घेतलात त्याचा राग जनतेच्या मनात आहे. गेल्या आठ महिन्यात ज्या वेगाने भूमिका बदलली त्याचा राग शिवसैनिकांना आहे. हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जो मोठा वर्ग आहे मराठी माणसाची अस्मिता जपणाऱ्या शिवसेना पक्षासमोरच्या आव्हानाच्या काळात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष उध्दव ठाकरे यांच्या व शिवसैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब, विधानसभेतील मुख्य प्रतोद अनिल पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार कपिल पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार सुनील प्रभू आदी उपस्थित होते.