अडाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन कंपनीवर बेमुदत ठिय्या आंदोलन करणेबाबत
अडाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशन कंपनीवर बेमुदत ठिय्या आंदोलन करणेबाबत
केंद्र शासनाने औष्णिक वीज प्रकल्पाच्या 300 किलोमीटरच्या परिसरात बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या विटांमध्ये ॲश वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक उद्योगांना ॲशची आवश्यकता असते. त्यातून स्थानिक वाहतुकदारांना रोजगार मिळत आहे. अनेकांनी कर्जे घेऊन वाहने खरेदी केली आहेत व स्वयंरोजगार निर्माण केला आहे. त्याचवेळी वीज प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या ॲशचा निचरा करणे प्रकल्पांवर बंधनकारक आहे.
परंतु अडाणी डहाणू थर्मल पॉवर स्टेशनने राखेतून नफेखोरी करण्यासाठी राखेची साठवणूक करुन कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
जानेवारी 2022 मध्ये कंपनीने अचानक ॲश पॉन्ड मधून राख उचलणेस मनाई केली व अडवणूक करुन महिनाभरानंतर अहमदाबादस्थित एका डमी कंपनीच्या नावाने बेकायदेशीरपणे 30 रुपये प्रतिटन दर आकारण्यास सुरुवात केली. आता पुन्हा कंपनीने 1 जानेवारी 2023 पासून ॲश पॉन्ड मधील ॲश उचलणेस मनाई केली आहे. अडवणूक करुन पुन्हा वारेमाप नफेखोरी करण्याचे कंपनीचे धोरण आहे. देशभरात अन्यत्र वीज प्रकल्पातून राख विनाशुल्क मिळत असताना डहाणूत मात्र राख विनावापर साठवणूक केली जात आहे. आणि त्याचवेळी अन्य राज्यातून मोफतची राख रेल्वे मालगाडीद्वारे आणून गरजवंताना विकली जात आहे.
कंपनीच्या अशा मनमानी धोरणाच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशन, तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री अशा सर्वांकडे कैफियत मांडली आहे. मात्र अजून पर्यंत प्रशासनाने व वीज प्रकल्प व्यवस्थापनाने दखल घेतलेली नाही. अखेर आधीच इशारा दिल्याप्रमाणे आम्ही स्थानिक वाहतुकदारांनी नाईलाजाने आज दिनांक 27 जानेवारी 2023 पासून अडाणी डहाणू थर्मल पॉवर प्रकल्पाचे विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढविण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय उरणार नाही.