मुंबई
विरोधकांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गुजरात दंगलीवरून तब्बल २० वर्ष विरोधकांनी बदनामी केली. सुप्रीम कोर्टाने त्यांना क्लीन चीट दिली. अशा अनेक घटनांमध्ये विरोध तोंडावर आपटले याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये याबाबत चर्चा करण्यात आली. आता बीबीसीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी चालवण्यात आली आहे. बीबीसी म्हणजे ‘बोगस बायस कँपेन’ आहे अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.
दिल्लीत पार पडलेल्या भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीत भाजपाचे राष्ट्रीय ध्यक्ष जे. पी. नड्डा यांना सन 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला, आम्ही त्याबद्दल अभिनंदन करतो. राष्ट्रीय कार्यकारणीतील झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आज मुंबई भाजपा कार्यालयात आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत घेऊन राष्ट्रीय अध्यक्षांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात विविध ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळाले. गुजरात निवडणुकीत ५३ टक्के मत मिळून भाजप क्रमांक एकचा पक्ष झाला.
तिथे भाजपने १८२ पैकी १५६ जागा जिंकल्या आहेत. इतिहासातील हा सगळ्यात मोठा विजय आहे.
गुजरातमध्ये आरक्षित असलेल्या ४० जागांपैकी ३४ जागा भाजपने जिंकल्या.
आदिवासी कोट्यातील २७ पैकी २३ जागावर भाजप विजयी झाले.
एससी कोट्यातील १३ पैकी ११ जागांवर भाजपने आपले उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात एखाद्या राज्यात ८६ टक्के जागा जिंकण्याचा विक्रम गुजरातमध्ये झाला., याबद्दल कार्यकारणीमध्ये अभिनंदन ठराव मांडण्यात आला.
ते पुढे म्हणाले,
सलग सात टर्म सरकार असूनही अँटी इन्कबन्सी हा शब्दही गुजरात निवडणुकीमध्ये कुठे दिसला नाही. विरोधकांच्या नकारात्मक राजकारणाला जनतेने नाकारलं आहे.
येत्या वर्षभरात त्रिपुरा, मेघालय, नागालँड, कर्नाटक, मिझोरम, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या नऊ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या राज्यातील निवडणुका गरीब कल्याण योजनांच्या जोरावर आम्ही पुन्हा जिंकू हा विश्वास कार्यकारणीत व्यक्त केला गेला असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताला G20 चे अध्यक्ष पद मिळाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाने घेतलेली ही झेप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे त्याबद्दल कार्यकारणीत त्यांचं अभिनंदन करण्यात आल्याचं आमदार ॲड. आशिष शेलार यांनी
सांगितले.