मंत्रालयात आयएनएस विक्रांत प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन
मंत्रालयात आयएनएस विक्रांत प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन
मुंबई,
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्रालय, संस्कारभारती कोकण प्रांत आणि ओरियन मॉल पनवेल यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातील राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रशांत ठाकुर, संजय शिरसाट, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, चित्रकार वासुदेव कामत, अभिनेते सुनिल बर्वे, संस्कारभारतीचे कोकण प्रातांचे कार्याध्यक्ष मुकुंद मराठे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, संस्कारभारतीचे रायगड जिल्हा महामंत्री ॲड.अमित चव्हाण, कमांडर विजय वडेरा, कमांडर तारापोर, ओरियन ग्रुपचे मंगेश परुळेकर, दिलीप फलेरिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानंतर प्रतिकृती तयार करणाऱ्या कलाकारांकडून आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृतीविषयी माहिती घेतली.
आयएनएस विक्रांतच्या प्रतिकृती विषयी…
भारतीय युद्धनौकेची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून संस्कार भारती संस्थेच्या पुढाकाराने आयएनएस विक्रांतची प्रतिकृती बनविण्यात आली. ही प्रतिकृती १२ ते २० जानेवारी पर्यंत प्रदर्शनासाठी मंत्रालयात ठेवण्यात येणार आहे. ‘संस्कार भारती’च्या चित्रशिल्प विभागाचे प्रमुख सिद्धार्थ साठे यांनी प्रतिकृती साकारलेली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका म्हणून आयएनएस विक्रांतचा भारतीयांना अभिमान आहे.