ज्याला संगीताची कदर त्याच्या सोबत ईश्वर – पंडित हरिप्रसाद चौरसिया
ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई दि. 24 डिसेंबर 2022
महम्मद रफी यांचा आवाज म्हणजे ईश्वरी जादू होती. त्यांनी आपल्या आवाजाने भजनेही अजरामर केली. असे गौरव उद्गार काढत पंडित हरिप्रसाद चौरसिया म्हणाले की, ज्यांना संगीताची कदर असते त्यांच्या सोबत ईश्वर असतो.
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ संगीत क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा करताना आपल्या बासरीच्या सुरांनी वेड लावणारे
ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार 2022 तर सुप्रसिध्द गायिका दिलराज कौर
यांना सन 2022 चा मोहम्मद रफी पुरस्कार डिस्ने हॉट स्टारचे भारतातील अध्यक्ष के. माधवन् यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार अँड आशिष शेलार, अँड प्रतिमा शेलार आदी उपस्थितीत होते.
आमदार ॲड.आशिष शेलार यांच्या स्पंदन आर्ट या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रातील एका
ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष असून एक लाख रू. धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो.
यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे “फिर रफी” या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण यांनी मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ यांनी केले.