उद्धवजी माफी मागा, अजित पवार माफी मागा, नाना पटोले माफी मागा…
मुंबई भाजपाकडून 'माफी मागो' आंदोलन
मुंबई:
उद्धव ठाकरे माफी मागा, अजित पवार माफी मागा, नाना पटोले माफी मागा, पाकिस्तान हाय हाय अश्या घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांनी आज मुंबईत ठिकठिकाणी रोष प्रकट केला. विशेष म्हणजे या आंदोलनात वारकरी दिंड्या ही सहभागी झाल्या होत्या.
हिंदू-देवदेवतां व महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करणारे महाविकास आघाडीतील नेते, विशेषत: शिवसेना उप नेत्या सुषमा अंधारे तसेच परमपूज्य महामानव डाँ
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणारे शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाने निदर्शने केली.
तसेच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध ही
यावेळी करण्यात आला. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मुंबईत कांदिवली रेल्वेस्थानक, अंधेरी पूर्व रेल्वेस्थानक, घाटकोपर पूर्व, दादर पूर्व रेल्वेस्थानक, भाजप प्रदेश कार्यालयाजवळ, स्वा. सावरकर पुतळा, विलेपार्ले या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शनं केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे. या विरोधात हे ‘माफी मागो’ आंदोलन करण्यात आले. टाळ मृदंगाचा गजर करीत वारकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच एकनाथ महाराज यांचा अपमान करणाऱ्या अंधारे यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, विधान परिषद गट नेते प्रवीण दरेकर, मुंबई प्रभारी अतुल भातकलकर, आमदार अमित साटम, आमदार प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, मनिषा चौधरी, योगेश सागर, सुनील राणे, विद्या ठाकूर, यांच्यासह महामंत्री संजय उपाध्याय, माजी आमदार मधू चव्हाण, माजी नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.