महाराष्ट्रमुंबई

२० ऑगस्टला भारतरत्न राजीव गांधी जयंतीच्या कार्यक्रमाला मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधींसह देशभरातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती, विधानसभेच्या प्रचाराचा नारळही फोडणार: रमेश चेन्नीथला

भारतरत्न राजीव गांधी जयंतीच्या मुंबईतील कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार महाराष्ट्र लुटून सुरतेला देणाऱ्या महाभ्रष्टयुती सरकार विरोधात चार्जशिट प्रसिद्ध करणार- नाना पटोले राजीव गांधी जयंतीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आढावा बैठक संपन्न.

मुंबई दि. ४ ऑगस्ट: दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून २० ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.
हॉटेल लिला येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत जागा वाटपाबद्द्ल चर्चा झालेली नाही, त्यासंदर्भात ७ तारखेच्या बैठकीत चर्चा होईल. कोणी किती जागा लढवणार यावर अद्याप चर्चा झालेली नाही. मविआ सक्षम आहे आणि सर्वजण मिळून महाराष्ट्रात मविआचे सरकार आणण्यासाठी एकजुट होऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. लोकसभा निवडणुकीत मविआला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. विधानसभेलाही असाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्याचा मविआचा प्रयत्न आहे. महाभ्रष्टयुती सरकारने राज्याचा स्वाभिमान विकला आहे, हे सरकार गुजरात धार्जिणे आहे. महाराष्ट्र लूटन सुरतेला देण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातील जमिनी, संपत्ती विकत आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्र वाचवणे हाच मविआचा संकल्प आहे. या मुद्दांवर बैठकीत चर्चा झाली. तसेच राज्यातील विविध मुद्दे घेऊन महाभ्रष्टयुती सरकार विरोधात चार्जसिट बनवून ते प्रसिद्ध केले जाणार आहे, त्यासंदर्भातही चर्चा झाली आहे. राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमाच्या दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, लाडकी बहिण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही. भाजपा व सत्ताधारी पक्षातील जे लोक काँग्रेसविरोधात असा अपप्रचार करत आहेत ते पराभवाने घाबरले आहेत. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. तेलंगणा, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने महिलांसाठी महालक्ष्मी योजना सुरु केलेली आहे, संजय गांधी निराधर योजना अनेक वर्षांपासून सुरु आहे. महायुती सरकारनेच काँग्रेसच्या योजनांची नक्कल केली आहे. महायुती सरकार महिलांना फक्त १५०० रुपये देणार आहे परंतु काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना लखपती केले जाईल.

कैदेतील सचिन वाझे संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, गृहमंत्री फडणवीस म्हणतात त्याच्याकडे व्हिडिओ, ऑडिओ आहेत, वाझे म्हणतो फडणवीसला माहिती दिली तर फडणवीस म्हणतात माझ्याकडे कसलाही कागद दिला नाही, ही सर्व नौटकी चालली आहे. कैदेतील व्यक्ती मीडियाशी कसा काय बोलू शकतो पण काँग्रेसला या विषयावर फार चर्चा करण्याची गरज वाटत नाही.
आजच्या बैठकीला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, माजी मंत्री अस्लम शेख, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button