गावदेवी मैदानाची दुरावस्था अन् वाहनतळाच्या उदघाटनाची घाई
गावदेवी मैदानाची दुरावस्था अन् वाहनतळाच्या उदघाटनाची घाई
गावदेवी मैदानाची पुरती दुरवस्था झाली असताना भूमीगत वाहनतळाच्या उद्घाटनाची ठाणे महापालिकेला घाई का झाली आहे.असा सवाल भाजपच्या नौपाडा प्रभागातील स्थानिक माजी नगरसेवकांनी केला असुन यासंदर्भातील निवेदन सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहे.तसेच, मैदान पुर्ववत न करता परस्पर निर्णय घेऊन वाहनतळ कार्यन्वित केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नौपाडा,गावदेवी मैदानात ठाणे महापालिकेने स्मार्ट सिटी योजने अंतर्गत उभारलेल्या भूमिगत वाहनतळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनेश जोशी,मृणाल पेंडसे आणि प्रतिभा राजेश मढवी यांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करून मैदाना संदर्भात घाईने निर्णय न घेण्याची विनंती केली.तसेच,अनेक मुद्दे आयुक्तांच्या निदर्शनास आणले. सर्वप्रथम प्रकल्पाला दिड वर्ष उशिर झाल्याने ठेकेदाराला दंड ठोठावण्यात यावा. वाहनतळ उभारताना मैदान उध्वस्त केल्याने त्याची दुरावस्था झाली आहे,तेव्हा मैदान पूर्ववत करून देशी झाडे लावण्यासह मैदानाचे सुशोभीकरण करावे. व्यायाम, खेळ, मॉर्निंग वॉक यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मैदानात फ्लड लाईट लावावेत. मैदान आणि वाहनतळ येथे कायमस्वरूपी महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षक नेमावेत. सुरक्षेसाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक उपकरण बसवावीत.वाहनतळ सुरु झाल्यानंतर वाहने पार्क करण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी पिक अवर्समध्ये होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियोजनाचा विचार करावा. गावदेवी भागातील रस्ते खड्डेमुक्त करून अतिक्रमण व फेरीवाले हटवावेत.आदी मागण्या भाजपच्या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केल्या असुन केवळ प्रसिद्धीसाठी घाईत उदघाटन केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे.