कल्याण डोंबिवली महापालिका कंत्राटी कामगारांच्या कष्टाचा पैसा कोणाच्या खिशात? मनसेचा सवाल
कल्याण डोंबिवली महापालिका कंत्राटी कामगारांच्या कष्टाचा पैसा कोणाच्या खिशात? मनसेचा सवाल
कल्याण डोंबिवली महापलिका हद्दीतील कचरा उचलण्याच्या कामासाठी ठोकपगारी आणि कंत्राटी कामगारांना कामावर घेण्यात आले आहे. या कामगारांना महापालिका ठेकेदारामार्फत किमान वेतनानुसार पगार देते. मात्र कागदावर २५ हजार पगार असताना प्रत्यक्षात मात्र कामगारांच्या हातात १५ हजार म्हणजेच दहा हजार रुपये कमी पगार मिळतो. ही बाब मनसेने निदर्शनास आणून देत कामगारांच्या कष्टाचा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच यामध्ये कोटय़ावधी रुपयांचा भ्रष्टाचार वर्षाकाठी होत असल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर याबाबत महापालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेताना संबंधित ठेकेदारासोबत करार केला जातो. किमान वेतन किंवा करारानुसार ठरलेलं वेतन ठेकेदाराला दिलं जातं. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आणखी काही तक्रारी असतील तर त्या कराव्यात, त्यानुसार चौकशी करत ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.