जळगाव जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस घाबरत आहेत – जयंत पाटील
जळगाव जिल्हा दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीस घाबरत आहेत - जयंत पाटील
दूध संघात अपहार नव्हे; तर चोरी झाली आहे. यामुळे तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस अधिक्षकांवर सत्ताधार्यांचा दबाव असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.जळगाव जिल्हा दुध संघात झालेल्या चोरीप्रकरणी दुध संघाच्या कार्यकारी संचालकांनी तक्रार केली असून २४ तास उलटल्यानंतरही आरोपींवर गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. आरोपींवर गुन्हा दाखल केला जावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे हे गुरुवार (१३ ऑक्टोबर) संध्याकाळपासून जळगाव शहर पोलीस कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार एकनाथ खडसे यांची उपोषणस्थळी जावून भेट घेतली व त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला शिवाय जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची भेटही घेतली.
जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्यावर प्रचंड दबाव आहे. गुन्हा दाखल करण्यात त्यांना भीती वाटत आहे असे दिसतेय. पोलीस स्वतः च्या कर्तव्यात कमी पडत आहेत. आपले कर्तव्य टाळत आहेत. असे स्पष्ट करतानाच नव्याने आलेले सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे, हे जळगाव चोरी प्रकरणावरून दिसत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.प्रविण मुंढे यांची भेट घेतल्यावर त्यांच्यावर राजकीय प्रचंड दबाव आहे म्हणून ते गुन्हा दाखल करुन घ्यायला घाबरत आहेत, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.दरम्यान २४ तास उलटूनही आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही याचा अर्थ ज्यांच्यावर आरोप आहेत ते लोक फरार होण्यासाठी पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला.
BYTE – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील