इस्लामपूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, कव्वाली कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत घडला प्रकार
इस्लामपूर राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून हवेत गोळीबार, कव्वाली कार्यक्रमात हजारोंच्या उपस्थितीत घडला प्रकार
इस्लामपूर मोमीन मोहल्ला येथे एका कवाली कार्यक्रमाच्या मंचावरूनच माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इस्लामपूर शहरात पैगंबर जयंतीनिमित्त ख्वाजा गरीब नवाज सोशल वेलफेअर ट्रस्टच्या वतीने सोमवारी सायंकाळी 7 वाजता आमिल आरिफ साबरी यांचा बज्मे कव्वालीचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळी हा प्रकार घडला. एका पक्षाचे हे माजी नगरसेवक नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतात. पूर्वीच्या वादातून मोमीन मोहल्ला परिसरातील पक्षाचे कार्यालय फोडण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांशी त्यांचा जोरदार वाद झाला होता. चार दिवसापूर्वी मोमीन मोहल्ला येथे कव्वालीचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत कवालीच्या मंचावरूनच या माजी नगरसेवकांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या कार्यक्रमास माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील यांनी कार्यक्रमासाठी काही वेळ उपस्थिती लावत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता माजी नगरसेवकाने हवेत गोळीबार करुन पोलीस प्रशासनाला एक प्रकारे कामाला लावले आहे. गोळीबाराचा तपास करुन पोलीस प्रशासन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.