बातम्यामहाराष्ट्रमुंबई
Trending

राज्यात वर्षभरात पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार

मुंबई

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभरातील पर्यटन उपक्रमांचे कॅलेंडर बनवणार असून ते राबविण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील विविध संस्था व शासनाच्या समन्वयाने राज्य व जिल्हास्तरावर समित्या स्थापन करणार असल्याची माहिती, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालय ‘पर्यटन नवा विचार, नवी दिशा’ अंतर्गत आणि दै. मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, पर्यटन संचालक बी. एन.पाटील, सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर, तरुण भारतचे संपादक किरण शेलार यासह पर्यटन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, राज्यात पर्यटन उपक्रम राबवण्यासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांची एक समिती नेमण्यात येईल. या समितीमार्फत राज्यभरात पर्यटन विषयक उपक्रम राबवण्यात येतील. महिलांना पर्यटन उद्योग क्षेत्रामध्ये संधी मिळावी यासाठी पर्यटन गाईड किंवा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम सुचवावेत. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातूनही पर्यटन विषयक कौशल्य वृद्धीसाठी आपल्या सर्वांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. आज पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून विविध पर्यटन विषयक उपक्रम राबवून रोजगार निर्माण करण्याचे नियोजन करता येईल. पर्यटन क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी देखील आपल्या सूचना मांडाव्यात. शासन व पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. या संवादातून महाराष्ट्र पर्यटन क्षेत्र देशातच नव्हे तर राज्यातही आपले स्थान निर्माण करेल. छत्रपती शिवरायांची पावन भूमी असलेले महाराष्ट्राची माहिती पर्यटकांना होण्यासाठी विविध उपक्रम राबवता येतील. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही रायगड किल्ला येथे महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे यासाठी सूचना कराव्यात. राज्यातील १५ महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शौचालय तसेच मुलभूत सोयी देखील करण्यात येतील असे मंत्री श्री. लोढा म्हणाले.
या कार्यक्रमात शिल्पा बोरकर यांनी पर्यटन विषयक शैक्षणिक संस्था, ओंकार ओक याने साहसी पर्यटन, मिलिंद चाळके यांनी कृषी पर्यटन, कॅरॅव्हन पर्यटन सचिन पांचाळ, ऐतिहासिक पर्यटन अस्लम सय्यद, शाश्वत पर्यटन महेश म्हणगोरे, ट्रेल संस्था रिद्धी जोशी, वेलनेस टुरिझम ऑपरेटर उमेश उणिकृष्णन, मेडिकल टूरिझम मिहीर व्होरा, वाईल्ड लाईफ टुरिझम लोकेश तारदलकर, टूरिझम असोसिएशन जय भाटिया, टुरिझम कन्सल्टंट मकरंद केसरकर, कंटेंट क्रिएटर अंकिता वालावलकर, अमोल जमदरे, गिआयटी टूर ऑपरेटर अमर महाजन यांनी यावेळी पर्यटन क्षेत्रातील अडचणी, आव्हान आणि समस्या यावर सादरीकरण करून पर्यटन क्षेत्रात आवश्यक बदल याबाबत मते मांडली. राष्ट्रीय पर्यटन पुरस्कारात बाजी मारणाऱ्या महाराष्ट्रातील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दै.तरूण भारतचे संपादक श्री. शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
या परिषदेत शैक्षणिक संस्था – विद्यापीठे आणि खाजगी महाविद्यालये, कारवान टूर ऑपरेटर., साहसी टूर ऑपरेटर, कृषी टूर ऑपरेटर, वन्यजीव टूर ऑपरेटर, शाश्वत टूर ऑपरेटर, हेरिटेज टूर ऑपरेटर, पर्यटन संघटना, ट्रॅव्हल स्टार्ट-अप, कंटेंट क्रिएटर्स, ट्रेल संयोजक (वारसा/वन्यजीव/पाकशास्त्र), सहायक सेवा प्रदाते, समूह समावेशी टूर ऑपरेटर यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button