मुंबई , अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश देताना न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाने उमेदवारी दिलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजेपर्यंत हे पत्र लटके यांना द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने महापालिकेला फटकारले आणि विशेषाधिकार असेल तर अशी प्रकरणे आमच्यासमोर येऊ नयेत, असे सांगितले. हा राजीनामा स्वीकारायचा की नाही, यावर कोर्टाने मुंबई महापालिकेला दुपारी 2.30 वाजता आपली भूमिका मांडण्यास सांगितले होते. पालिकेने बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. न्यायालय म्हणाले, सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला इतके महत्त्व का दिले जात आहे? दुसरीकडे, एखाद्या कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची असेल, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारावा. हे प्रकरण इथे यायला नको होते. सुनावणीदरम्यान ऋतुजा लट्टे यांच्या वतीने राजकीय दबावामुळे राजीनामा रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. राजीनाम्याची योग्य प्रक्रिया पाळली गेली नसल्याचा युक्तिवाद पालिकेने केला.