बातम्यामहाराष्ट्र
Trending

तरुणांमधील नवसंकल्पना, स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी राज्यात उद्यापासून प्रशिक्षण शिबिर – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

१७ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
—————————
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेअंतर्गत राज्यात उद्यापासून १३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान स्टार्टअप्ससाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा विविध उपक्रमांमधून राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्टार्टअप्सना १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके
या उपक्रमाअंतर्गत उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या युवकांना १ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके दिली जाणार आहेत. विजेत्यांना येत्या १७ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
यासंदर्भात विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा म्हणाल्या की, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रत्येक तालुक्यात मोबाईल व्हॅन फिरवून प्रबोधन करण्यात आले. महाविद्यालयांमध्येही प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेचाच भाग म्हणून आता प्रशिक्षण आणि सादरीकरण सत्रे (Bootcamp) आयोजित करण्यात आली आहेत. तरुणांमध्ये असलेली कल्पकता आणि बुद्धिमत्ता शोधून त्याला चालना देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमातून कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ ऊर्जा इत्यादी), स्मार्ट पायाभूत सुविधा, गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना चालना देण्यात येणार आहे. यामाध्यमातून युवकांमधील नवसंकल्पनांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत या उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन. म्हणाले की, जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांमध्ये स्थानिक उद्योजकांची व्याख्याने होतील. त्याचबरोबर नवीन संकल्पना घेवून येणाऱ्या नागरीकांना त्यांच्या संकल्पनांचे शासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल. याअंतर्गत विविध विषयातील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. जिल्ह्यांमध्ये उत्तम ३ विजेत्यांची निवड केली जाईल. २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येतील. राज्यस्तरावर २१ विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. यामध्ये प्रथम पारितोषिक १ लाख रुपये तर द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये आहे. तसेच सर्वोत्कृष्ट ७ महिला उद्योजकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. विजेत्या संकल्पनांना प्री-इन्क्युबेशन तसेच इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधी सहाय्य, स्टार्टअप परिसंस्थेतील तज्ज्ञ व संस्थांद्वारे मार्गदर्शन, सॉफ्टवेअर, क्लाऊड क्रेडीट्स यांसह इतर आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button