प्रकल्पग्रस्तांना मूळ घराजवळच सदनिका मिळणार आदित्य ठाकरेंचा निर्णय रदबादल
प्रकल्पग्रस्तांना मूळ घराजवळच सदनिका मिळणार आदित्य ठाकरेंचा निर्णय रदबादल
—————————-
मुंबई/श्रीश उपाध्याय
—————————
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पबाधितांच्या संदर्भात घेतलेला अत्यंत अडनीडा निर्णय रदबादल करण्याची भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांची मागणी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मान्य केली आहे. त्यामुळे मालाडच्या प्रकल्पग्रस्तांना मूळ घराजवळच सदनिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार अतुल भातखळकर यांनी मालाडच्या प्रकल्पग्रस्तांना मूळ घराजवळच सदनिका देण्याची मागणी पुन्हा एकदा उचलून धरली. यावेळी पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भातखळकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रकल्पबाधितांना न्याय दिला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मालाडमधील प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये सदनिका देण्याचा आणि तेथील प्रकल्पग्रस्तांना मालाडमध्ये सदनिका देण्याचा निर्णय झाला होता. प्रकल्पबाधितांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. मविआच्या काळात ही मागणी भातखळकर यांनी सातत्याने लावून धरली तरीही प्रकल्पबाधितांना न्याय मिळाला नाही. मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रकल्पबाधितांसाठी उपलब्ध सदनिकांपैकी ७५ टक्के सदनिका आता स्थानिक प्रकल्पबाधितांना उपलब्ध होणार आहे.
मालाडच्या प्रकल्पबाधितांच्या वतीने भातखळकर यांनी लोढा यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बराच काळ हवालदिल झालेल्या मालाडच्या रहीवाशांना न्याय मिळाला आहे.