Uncategorizedकरमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा - कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

विजय कुमार यादव

 

मुंबई, दि 1 :

औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनपूर्वक आयोजन करण्यात यावे अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.

प्रधानमंत्री कौशल्य व महारोजगार मेळावा राज्यभरात आयोजित करण्याबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली.

बैठकीस कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव नामदेव भोसले, संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण बी. ए. दळवी, कौशल्य विभागाचे उपसंचालक श्री. पवार, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण योगेश पाटील यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील आयटीआयचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील पायाभूत सुविधा, देखभाल दुरुस्ती, याबाबत धोरण तयार करुन प्रस्ताव सादर करण्यात यावेत. तसेच राज्यातील आयटीआय मध्ये नवीन अभ्यासक्रम राबविण्यात यावेत, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटीचे (आयएमसी) बळकटीकरण करण्यात यावे. रोजगार मेळाव्यात अधिक प्रमाणात रोजगार देणाऱ्या कंपन्यांना निमंत्रित करून अधिकाधिक तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत. आय. टी. आय. मध्ये नवीन व अद्ययावत अभ्यासक्रम राबवण्यात यावे. आय. टी. आय. मध्ये उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. या मेळाव्यात महामंडळ, वित्तीय संस्थांना आमंत्रित करण्यात यावे, अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी दिल्या.

राज्यातील आयटीआयची सद्यस्थिती पाहता देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी आयटीआयने उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खर्च (पीओटीएस) करावा, अशा सूचना मंत्री श्री.लोढा यांनी केल्या. राज्यातील आयटीआयच्या अंतर्गत वसतिगृहाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

प्रधान सचिव श्रीमती वर्मा यांनी राज्यातील सर्व आयटीआय आधुनिकीकरणासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल व विविध क्षेत्रांमध्ये आयटीआयला ब्रँड बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button