करमणूकनागपूरपुणेबातम्याभारतमुंबईलाईफस्टाईल
Trending

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

विजय कुमार यादव

नवी दिल्ली, 24 :

महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुशिल शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिक हा नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. दिवेश हा नागपूर येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या दोघांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती भवनच्या दरबारहॉल मध्ये ‘राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2020- 21′ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक, युवक कल्याण विभागाचे सचिव संजय कुमार आणि क्रीडा विभागाच्या सचिव सुजाता चतुर्वेदी उपस्थित होत्या.

या विशेष कार्यक्रमात देशाच्या विविध भागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक, कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात आले. यावेळी एकूण 42 पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या श्रेणीत देशातील एकूण 10 कार्यक्रम अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. यात मुंबई येथील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चैताली चक्रवर्ती यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वरूप श्री. शिंदे यांना रजतपदक, प्रमाणपत्र आणि दीड लाख रुपये तर डॉ. चक्रवर्ती यांना चषक आणि 2 लाख रुपये प्रदान करण्यात आले.

श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कंपोस्टिंग, ऊर्जा संरक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केले. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सेंद्रीय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, रक्तदान शिबीर आयोजन आणि वृक्षारोपण क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट स्वयंसेवकांच्या श्रेणीत देशभरातील 30 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या श्रेणीत महाराष्ट्रातून नंदुरबार येथील प्रतिक कदम आणि नागपूर येथील विद्यार्थी दिवेश गिन्नोर यांनाही गौरविण्यात आले. प्रत्येकी रजतपदक, प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रतिक कदम यांनी वन्यजीव संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी 4 हजारांहून अधिक सापांचा तसेच, मोर आणि बिबट्यांच्या पिलांचा जीव वाचवून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले. कोविड महामारीच्या काळात स्वत: मास्क तयार करून गरजूंना त्याचे वाटप केले. कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती करुन त्यांनी लसीकरणाबाबत नागरिकांना प्रोत्साहित केले. त्यांनी रक्तदान आणि वृक्षारोपण कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

दिवेश गिन्नारे यांनी शासनाच्या सांप्रदायिक सौहार्द निधी मध्ये 11 हजार 688 रुपये गोळा करून जमा केले. गिन्नारे यांनी विविध जनजागृतिविषयक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button