करमणूकपुणेबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीन स्टार्टअप्सनी पीक विमा क्षेत्रात आपले योगदान द्यावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजय कुमार यादव

मुंबई, दि. 21 :

येत्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून पीक विमा क्षेत्रात देखील तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येणार आहे. नवीन स्टार्टअप्सनी या क्षेत्रात आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट 2022’ मध्ये श्री. फडणवीस बोलत होते. ‘क्रेड’ कंपनीचे संस्थापक कुणाल शाह यांनी त्यांची मुलाखत घेतली.

श्री. फडणवीस म्हणाले, राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तंत्रज्ञानामुळे कामात गुणवत्ता आणि पारदर्शकता येते. देशात सुमारे 80 हजार स्टार्टअप्स आणि शंभर युनिकॉर्न असून त्यापैकी 50 हजार स्टार्टअप्स आणि 25 युनिकॉर्न हे एकट्या महाराष्ट्रात आहेत. मुंबई ही फिनटेक स्टार्टअप्स कॅपिटल बनली आहे. राज्यात स्टार्टअप्स वाढीसाठी प्रोत्साहन देण्यात येत असून त्यासाठी इको सिस्टीम वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई बाबत बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई आता बदलत आहे. सुमारे 300 कि. मी. लांबीचे मेट्रोचे जाळे तयार होत असून मेट्रो आणि कोस्टल रोड मुळे दळणवळण अधिक गतीने होईल. सध्या सुमारे नऊ दशलक्ष प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. तर, मेट्रोमधून आठ दशलक्ष लोक प्रवास करू शकणार आहेत. यामुळे प्रवास करणे सुलभ होऊन वेळेची बचत होणार आहे. ट्रान्स हार्बर हा 22 कि.मी. चा सर्वात लांब समुद्री मार्ग तयार होत आहे, यामुळे मुंबई जवळ नैना हे पूरक क्षेत्र तयार होत आहे.

नवीन पिढी अतिशय हुशार असून मला त्यांच्याकडून नवीन बाबी शिकण्याची प्रेरणा मिळते, असे सांगून श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विविध क्षेत्रांशी संबंधित युवकांना ‘सीएम फेलो’ म्हणून संधी दिल्याचे सांगितले. युवकांकडे नवीन दृष्टिकोन असतो, त्यामुळे मी त्यांच्याशी नियमित संवाद साधतो, असेही ते म्हणाले.

नजिकच्या भविष्यात सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल दिसून येतील. याचप्रमाणे शासनाच्या कामांमध्ये देखील मोठे सकारात्मक बदल होणार असून यात तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण सहभाग असेल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे, यामुळे रोजगाराभिमुख शिक्षण मिळणार असून येत्या काही वर्षात बेरोजगारीची समस्या 50 टक्क्यांनी कमी झालेली असेल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button