विधानमंडळाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विधानमंडळाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विजय कुमार यादव
मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सचिवालयातील अधिकाऱ्यांना दिले.संकेतस्थळ अद्ययावत करण्याबाबत विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मागणी केली होती. त्यानुषंगाने डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आढावा बैठक घेण्यात आली.उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महाराष्ट्र विधानमंडळाच्या कामकाजाबाबत विविध स्तरावरून विचारणा होत असते. यात प्रामुख्याने संशोधक, पीएचडीचे विद्यार्थी, आमदार आणि इतर राज्यातील लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. यात काही हिंदी, इंग्रजी भाषिकही आहेत. त्यांना सहज माहिती मिळविण्यासाठी विधानमंडळाच्या संकेतस्थळाला भेट देण्याच्या सूचना केल्या जातात. अशावेळी संकेतस्थळ अद्ययावत असणे गरजेचे आहे.
माहितीचा अधिकार, विधेयके, दोन्ही सभागृहाची मार्गदर्शिका, विधानमंडळ सचिवालयातील विविध शाखा आणि समित्या, पीठासीन अधिकारी, कॅगचा अहवाल अशी माहिती अद्ययावत करून संकेतस्थळावर उपलब्ध करावी. दोन्ही सभागृहात सादर किंवा मंजूर झालेल्या विधेयकांची माहिती बहुभाषेत असावी. अधिवेशन कालावधीत सदस्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्न/ मागण्यांच्या व्हिडीओ चित्रिकरणाची मागणी होते. त्यांना लवकरात लवकर मान्यता देवून चित्रीकरण उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सोपी करावी. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांची प्रश्नावली तयार करून त्यावरील उत्तरांची यादी संकेतस्थळावर असावी. विधानसभा आणि विधानपरिषदेतील नवीन सदस्यांना अद्ययावत संकेतस्थळच्या माहितीसाठी सादरीकरण करण्यात यावे. विधानमंडळाच्या ऐतिहासिक दस्तावेज डिजिटायजेशच्या कामांना गती देण्यात यावी, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.या बैठकीला आमदार मनीषा कायंदे, प्रधान सचिव डॉ. राजेंद्र भागवत, विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.