बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मला महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर विशेषतः तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे ;

जनतेच्या पाठिंब्यावर १९८० चे चित्र उभे करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणार - शरद पवार

पंतप्रधानांनी केलेल्या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केले त्याबद्दल जाहीर आभार…

माझ्याकडे जे चित्र मांडले तेच जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. ते जर त्यांनी मांडले तर त्यावर माझा विश्वास बसेल आणि मांडले नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन…

उद्या कराडमधून जनतेच्या दरबारात;शरद पवारांनी रणशिंग फुंकले…

पुणे

दि. ३ जुलै – १९८० ला जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्रात जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल हा माझा एककलमी कार्यक्रम राहिल. मला महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर विशेषतः तरुण पिढीवर प्रचंड विश्वास आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त करत एकप्रकारे रणशिंग फुंकले आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपसोबत जाऊन मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आदरणीय शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत पक्षाची वाटचाल कशी असणार ही भूमिका मांडली.

पक्षाच्या भवितव्याचा प्रश्न असेल तर आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल मला नवीन नाही असे स्पष्ट सांगतानाच शरद पवार यांनी १९८० साली निवडणूकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करत होतो त्या पक्षाचे ५८ आमदार निवडून आले होते. आणि एक महिन्यानंतर त्या ५८ पैकी ६ सोडले तर सगळे मला पक्षाला सोडून गेले. त्या ५८ जणांचा विरोधी पक्षनेता होतो त्याऐवजी मी पाचच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना घेऊन पुन्हा पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो. माझा उद्देश होता की पुन्हा पक्षाची बांधणी करायची आणि पाच वर्षांने निवडणूक झाली त्या निवडणुकीत आमची संख्या ६९ वर गेली. म्हणजे संख्या वाढली. पाच जणांचा नेता असतानाही संख्या वाढली. नुसतीच वाढली नाही तर जे पक्ष सोडून गेले त्यापैकी चार सोडले तर सगळे पराभूत झाले ही आठवण आणि घडलेला प्रसंगही शरद पवार यांनी सांगत पक्षाची रणनीती काय असणार आहे हे स्पष्टपणे अधोरेखित केले.

 

देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात एक विधान केले होते. त्यात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारामध्ये सापडलेला आहे. त्यात त्यांनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागाचा उल्लेख केला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी आहे असा आरोपही केला. मात्र मला आनंद आहे आज मंत्रीमंडळात राष्ट्रवादीच्या काही लोकांना त्यांनी शपथ दिली याचा अर्थ यासंबंधीचे त्यांनी केलेले आरोप वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्याबद्दल आरोप केले होते त्या सगळ्यांना मुक्त केले. त्याबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

आमच्या लोकांनी पक्षाची जी भूमिका आहे त्यापेक्षावेगळी भूमिका घेतली. ६ जुलैला मी पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत संघटनात्मक बदल करण्याचे जे प्रश्न उपस्थित केले गेले होते त्याचा विचार करणार होतो. जे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्यापूर्वीच काही लोकांनी पक्षापासून एकदम वेगळी भूमिका घेतली. ती भूमिका घेऊन आम्हीच पक्ष आहोत हे मांडले. पक्षाच्या विधीमंडळ सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली यासंबंधीचे चित्र आणखी दोन – तीन दिवसात लोकांसमोर येईल. त्याचे कारण ज्यांची नावे आली त्यातील काही लोकांनी आज माझ्याशी संपर्क साधला आणि आम्हाला यातील काही कल्पना नाही. आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे ती कायम आहे. याचा खुलासा माझ्याकडे केला आहे. यावर मी आताच काय बोलू इच्छित नाही याचे स्वच्छ चित्र माझ्या इतकंच जनतेसमोर मांडण्याची आवश्यकता आहे. ते जर त्यांनी मांडले तर त्यावर माझा विश्वास बसेल आणि मांडले नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन असेही शरद पवार म्हणाले.

 

मागची जी निवडणूक झाली त्यावेळीसुध्दा असेच चित्र होते. पण संबध महाराष्ट्रात जाऊन आपली भूमिका मांडण्याचे काम केले आणि त्याचा परिणाम आमची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आणि यश मिळाले व संयुक्त सरकार स्थापन केले.आता पुन्हा तीच स्थिती आहे.आज मला देशाच्या कानाकोपऱ्यातून फोन आले. या सगळ्या स्थितीत आपण एक आहोत. अशाप्रकारच्या भूमिका लोक मांडत आहेत. आता इथे येण्याअगोदर अनेकांचे फोन आले. या देशात एक पर्यायी शक्ती उभी करावी याची आवश्यकता आहे असे म्हणणारे या सर्वांची ही भूमिका आहे. त्यामुळे जो प्रकार घडला त्याची मला चिंता नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

आजचा दिवस संपल्यावर उद्या सकाळी कराडला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार. त्यानंतर राज्यात आणि देशात जावून लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button