उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर – उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर - उद्योगमंत्री उदय सामंत
विजय कुमार यादव
ठाणे, दि. 14 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिकस्तरावरील ‘बॉयलर इंडिया 2022’ प्रदर्शन, चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत आणि कामगार मंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. राज्यात उद्योगासाठी पूरक वातावरण असून उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्राच्या ठिकाणी तीन दिवस ‘बॉयलर इंडिया 2022’ प्रदर्शन, चर्चासत्र भरविण्यात आले आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, विभागीय आयुक्त तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, कामगार आयुक्त सुरेश जाधव, बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल अंतापूरकर, अदानी पॉवरचे थर्मल हेड चैतन्य प्रसाद साहू, थायसन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भाटिया आदी यावेळी उपस्थित होते.या प्रदर्शनात जर्मनी, स्विझरलँड, इंग्लंड या देशांसह दहा देशातील सुमारे 280 उद्योजकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला आहे. बाष्पके (बॉयलर) संबंधीत विविध यंत्रे, साहित्य यांची मांडणी येथे आहे. याशिवाय बाष्पके उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, घडामोडी यांची माहिती होण्यासाठी चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन तीन दिवस चालणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी बॉयलर क्षेत्राशी संबंधित तीन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले की, बाष्पके (बॉयलर) क्षेत्रात होणारे बदल, या क्षेत्रासंबंधीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त आहे. कामगार व उद्योग विभाग एकत्र येऊन उद्योगांना चांगल्या सुविधा देऊ. सध्या असलेल्या व नवीन उद्योगांनाही इतर राज्यांपेक्षा वीज पुरवठा, जमीन व इतर प्रोत्साहनपर सुविधा महाराष्ट्र शासन देईल. राज्यात नवनवीन उद्योग येण्यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली असून वेदांतापेक्षाही मोठा उद्योग राज्यात आणण्यात येईल, असे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे.राज्यातील सर्व प्रकल्पांना इतर राज्यांपेक्षाही चांगल्या सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करत आहे. बॉयलर उद्योग वाढीसाठीही राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. राज्यात बॉयलर पार्क उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण मदत देण्यात येईल. तसेच या क्षेत्रासाठीही प्रोत्साहनपर पॅकेज देण्यासाठीही प्रयत्न करू, असेही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले. उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभागाचे योगदान – कामगार मंत्री सुरेश खाडे
कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले की, उद्योग क्षेत्रात राज्य अग्रेसर ठेवण्यासाठी कामगार विभाग योगदान देत असून उद्योगांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. उद्योग उभारण्यासाठी परवान्यांची सुलभता, कामगारांची सुरक्षितता व कामगार हित या त्रिसूत्रीची अंमलबजावणी राज्यात प्रभावीपणे सुरू आहे. उद्योग व कामगार विभाग हे एकत्र काम करत आहेत. बॉयलर हा सर्व उद्योगांचा महत्त्वाचा घटक आहे. या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊन पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीमध्ये हातभार लागेल, यासाठी बाष्पके निर्माते व वापरकर्त्यांनी प्रयत्न करावेत.व्यवसाय सुलभीकरण अंतर्गत (ईज ऑफ डुइंग बिझनेस) राज्यातील 392 सेवा ऑनलाईन झाल्या असून त्यापैकी 41 सेवा या कामगार विभागाशी संबंधित आहेत. त्यातही बॉयलर विभागाच्या सर्वाधिक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. व्यवसाय सुलभीकरणामध्ये कामगार विभागाने मूलभूत व महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याअंतर्गत एक खिडकी योजना राबवून एकाच अर्जावर सर्व परवाने देण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी मंत्री श्री. सामंत, श्री. खाडे यांनीही प्रदर्शनस्थळातील विविध स्टॉलना भेटी देऊन माहिती घेतली. प्रधान सचिव विनिता वेद सिंघल यांनी प्रदर्शन व चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. श्री. अंतापूरकर यांनी प्रास्ताविकात बाष्पके संचालनालयाची माहिती व चर्चासत्राविषयी माहिती दिली. यावेळी उद्योग प्रतिनिधींनीही मनोगत व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रमानंतर बाष्पके उद्योगाशी संबंधित विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.