भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने विचारमंथन आवश्यक
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
विजय कुमार यादव
मुंबई, दि. 13 :
शिक्षणाला कोणत्याही भौगोलिक सीमा नसतात. शिक्षण हे जीवननिर्मित, मानवनिर्मित आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्व निर्माण करणारे असावे. ऋग्वेदामध्ये सामूहिक मंथन आणि चिंतनाला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये उच्च शैक्षणिक सहकार्याच्या दृष्टीने सातत्याने विचार मंथन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने राज्यपालांच्या पुढाकाराने आयोजित उच्च शिक्षण परिषदेचे उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन संपन्न झाले.
या परिषदेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माइक हँकी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अमेरिकेच्या विविध विद्यापीठांचे प्रमुख तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरु व कुलसचिव उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याला अधिक महत्त्व आहे. या परिषदेमुळे अमेरिका आणि भारत यांच्यात अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थी आणि शिक्षक आदानप्रदान, विविध अभ्यासक्रम आखणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा होईल.
ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व – चंद्रकांत पाटील
भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. ही अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आमचे ध्येय असून आजच्या जगात ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व आहे. माहिती तंत्रज्ञान हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचे प्रमुख उदाहरण आहे. भारताने अमेरिकेप्रमाणेच ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेत लक्षणीय प्रगती केली आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले, भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची महत्वाची भूमिका आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी मानली जाते. देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्व आहे व यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले आहे. हे एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे. भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे धोरण तयार करण्यात आले आहे. भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. या धोरणानुसार बौद्धिक विकास व अध्ययनाच्या तत्वांवर आधारित अभ्यासक्रम व अध्ययन, शाखांची रचना करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल यावर भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर आहे. उच्च शिक्षणात सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न आहेत. आजच्या या बैठकीतून अनेक विषयांवर चर्चा होईल यासाठी हा संवाद महत्वपूर्ण ठरेल आणि या चर्चेतून महत्वपूर्ण सूचना सुद्धा येतील यामुळे राज्याचे धोरण ठरवण्यास मदत होईल. महाराष्ट्र आणि अमेरिकेतील विद्यापीठे एकत्र आल्यास एकविसाव्या शतकातील शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत होईल. महाराष्ट्रातून दरवर्षी एक लाख विद्यार्थी परदेशात विविध विद्यापीठांमध्ये पाठविण्याचे उद्दिष्ट आहे. भारताने अनेक उत्कृष्ट उद्योजक दिले आहेत. स्टार्ट अप इंडिया गेम चेंजर असल्याचे सिद्ध होत आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी अनेक उत्कृष्ट उत्पादने आणि कल्पना प्रदर्शित केल्या आहेत. अमेरिकेचे सामर्थ्य आणि भारताची भव्यता एकत्र येऊन भविष्यात नेत्रदीपक कामगिरी करता येईल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
या परिषदेत द्विपदवी अध्ययन व अध्यापन प्रक्रिया, संशोधन, विविध अभ्यासक्रम, भाषांतर, चर्चासत्र, शैक्षणिक परिषदा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.