भाजपा हा हिंदू सण सुरु ठेवणारा पक्ष, बंद पाडणारा नाही – मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार
भाजपा हा हिंदू सण सुरु ठेवणारा पक्ष, बंद पाडणारा नाही - मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार
————————-
श्रीश उपाध्याय/मुंबई, दि. 4 सप्टेंबर
———————
भाजपा हा पक्ष हिंदू सण सुरू ठेवणारा, जोपसणारा, वाढवणारा पक्ष आहे. तो आमचा आत्मा आहे. मा. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेप्रमाणे आम्ही हिंदू सण बंद करणारे नाही, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली.
मुंबई भाजपातर्फे मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये 1026 मंडळे सहभागी झाली आहेत. या मंडळाचे परिक्षण करण्यासाठी तज्ञांची 30 पथके तयार करण्यात आली आहेत. आज मुंबई भाजपा कार्यालयाजवळून या पथकांच्या गाडयांना आमदार अॅड आशिष शेलार यांनी झेंडा दाखवून सन्मानाने रवाना केले. यावेळी विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, प्रतोद आमदार प्रसाद लाड यांच्यासह महामंत्री संजय उपाध्याय, कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडिवरेकर, गणेशोत्सव समन्वय महासंघाचे सरचिटणीस सुरेश सरनौबत यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेबाबत माहिती देताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, हिंदू सण हा भाजपाचा आत्मा असून आम्ही कोरोना काळातही सण अखंडित ठेवण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचे संकट टळल्यानंतर दहिहंडी उत्सव भाजपाने जोरदार साजरा केला, आता गणेशोत्सवात ही भाजपा हिरहिरीने सहभागी झालो आहोत. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा जाहीर करताच त्याला मंडळाचां प्रचंड प्रतिसाद मिळाला असून मुंबईतील 1026 मंडळे सहभागी झाली आहेत. त्यांचे परिक्षण 30 पथके करणार असून प्रत्येक पथकात कॅमे-यासह 3 जण असून एकुण 90 जणांचा समावेश असलेली ही पथके या सगळयांचे परिक्षण करणार आहेत. कोराना काळात दुदैवाने मा. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने 100 वर्षांची लालबागच्या राजाची परंपरा खंडित केली. अशा प्रकारे हिंदु सणांना विरोध करणारे आम्ही नाही, भाजपा सणांची परंपरा जोपासणारा पक्ष आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मुंबई भाजपाचा गणेशदर्शन दौरा सुरू
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी गणेशोत्सवा निमित्ताने मुंबईच्या सहाही जिल्हयांचा दौरा सुरू केला असून रोज रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत ते मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना भेट देत आहेत. गेले दोन दिवसात त्यांनी उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम या जिल्हयात दौरा करुन 30 मंडळांना भेटी दिल्या. या दौ-यात स्थानिक आमदार आणि भाजपा पदाधिकारीही मोठया संख्येने सहभागी होत असून ढोल ताशांचा गजरात, फटाक्यांची आतिशबाजी करीत गणपती बाप्पाचा जयजयकार करीत हे दौरे सुरू आहेत. या दौ-यांमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे. मंगळवारी दक्षिण मुंबई तर बुधवारी दक्षिण मध्य मुंबई, गुरूवारी उत्तर पूर्व जिल्हयांचा दौरा करणार आहेत.