महाराष्ट्रमुंबई
Trending

संस्कार आणि सेवेचा मंगलकारी सुयोग

संस्कार आणि सेवेचा मंगलकारी सुयोग

श्वेता परूळकर

मुंबई, दि. 21 ऑगस्ट

सतत केलेल्या परिश्रमानंतर मिळालेले फळ आनंददायी असते. मिळालेल्या यशाचा समाजाच्या सोबतीने आनंद घेणे हे संस्कारित जीवनाचे सर्वश्रेष्ठ उदाहरण असते. केवळ व्यक्तिगत विकासाऐवजी समाज आणि देशाचा विकास अशी विचारधारा ठेवणारी व्यक्ती जेव्हा राजकारणात येते तेव्हा यश आपसूक मिळते. भारतीय संस्कृती आणि समाजाची नैतिक मूल्ये जपणे हा प्राधान्यक्रम ठरतो. हिंदुत्वाच्या विचारधारेचा प्रचार करताना स्वतःला झोकून देऊन समाजाला एका अतूट धाग्यात बांधण्याचे कार्य ॲड. आमदार मंगलप्रभात लोढा करत आहेत.

जोधपूरमध्ये जन्मलेले मंगलप्रभात लोढा लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. त्यांचे वडील गुमानमल लोढा हे एक प्रसिद्ध वकील आणि भारतीय जनसंघाच्या राजस्थान युनिटचे अध्यक्ष होते. नंतर गुमानमल हे जोधपूरमधील भारतीय जनसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. गुमानमल यांचे पुत्र मंगलप्रभात लोढा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्ष शिक्षित स्वयंसेवक आहेत. लहानपणापासूनच देशप्रेम, देशभक्ती आणि धर्मावरची निष्ठा त्यांच्या स्वभावात रुजलेली होती. मंगलजींच्या मनात हे संस्कार बीज त्यांच्या पालकांनी लहानपणीच रोवले. जोधपूर विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून काम करताना ते जोधपूर विभागाचे महामंत्री होते.

मंगलजी १९७५ मध्ये नवनिर्माण चळवळीत सामील झाले. त्यांनी जोधपूर विभागात विद्यार्थी नेते म्हणून जयप्रकाश नारायण यांच्यासोबत काम केले.

बी. कॉम आणि लॉ केल्यानंतर मंगलप्रभात जयपूर हायकोर्टात प्रॅक्टिस करू लागले. १९७७ मध्ये त्यांचे वडील उच्च न्यायालयात न्यायाधीश झाल्यावर त्यांच्या सुसंस्कृत मनाने तिथे वकिली करणे योग्य मानले नाही. त्यानंतर मंगलप्रभात मुंबईत आले. मुंबईत चार वर्षे नोकरी केली. नोकरीत असतानाही मंगलजी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेत सक्रिय राहिले.

मंगलप्रभात अयोध्येला गेले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही त्यांनी ठळकपणे सहभाग घेतला. तिथे त्यांना अटक झाली. बाबरीचा ढाचा पाडण्यात आला तेव्हा मंगलप्रभात यांचाही कारसेवकांच्या संघात समावेश होता. त्यांनी भाजपाचे तत्कालीन संघटन मंत्री शेषाद्री चारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मंगलप्रभात हे श्रीरामजन्मभूमी आंदोलनादरम्यान वाळकेश्वर युनिटचे अध्यक्ष होते आणि नंतर त्यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा तो काळ होता जेव्हा त्यांच्या निव्वळ राजकीय प्रवासाला वेग आला होता. मंगलजींनी अनेक चळवळींमध्ये ठळकपणे सहभाग घेतला. त्यांनी व्हीटी स्टेशनचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज करण्यासाठी मोठे आंदोलन केले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनादरम्यान ग्रँट रोड स्थानकावर ट्रेन थांबवल्याबद्दल मंगलजी यांच्यावर आजही खटला सुरू आहे. त्यांच्यासह १८ कारसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम मंदिर आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात घुसून शिला पूजन करण्याचे धाडस त्यांनी केले. याबाबतचा खटलाही आजतागायत सुरू आहे. याच काळात मंगलजींनी तुटपुंज्या भांडवलात इमारत बांधकामाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

याच काळात मंगलप्रभात विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता म्हणून सक्रियपणे काम करत राहिले. १९९५ मध्ये त्यांना भाजपाच्या वतीने मलबार हिलमधून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले. ही तीच जागा होती जिथून भाजपला कधीही निवडणूक जिंकता आली नव्हती. या जागेवर भाजपला सुमारे १० ते १५ हजार मतांवर समाधान मानावे लागत होते. श्रीरामजन्मभूमी आंदोलनाकडे लोकांचा कल आणि काँग्रेसविरोधी लाटेत तत्कालीन मंत्री बी. ए. देसाई यांचा पराभव करून मंगलप्रभात लोढा यांनी ही जागा जिंकली. त्यानंतर त्यांनी सलग ६ निवडणुका लढवल्या. पहिल्या निवडणुकीत केवळ ८०० मतांनी विजयी झालेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या विजयाचे अंतर त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत सातत्याने वाढतच आहे. २०१९ च्या निवडणुकीत ही संख्या ९० हजारांवर पोहोचली असली तरी याचे श्रेय मंगलजी जनता आणि हिंदुत्व यालाच देतात. मतदारांचे आभार मानताना ते म्हणतात की, मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मतदारांनी माझ्यामध्ये प्रामाणिक नेत्याची प्रतिमा पाहिली आणि स्वार्थाशिवाय राजकारण करता येते, हे त्यांच्या लक्षात आले असेल, कारण माझ्यासाठी मतदारांची सेवा हे काम आद्य कर्तव्य आहे.

मंगलप्रभात यांच्या दूरदृष्टीला आजही लोक दाद देतात. त्यांनी १९९५ मध्येच माहितीच्या अधिकाराचा (आरटीआय) मसुदा तयार केला होता आणि विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता. याशिवाय त्यांनी अनेक सेवाकार्ये अखंडपणे सुरू ठेवली आहेत. मुंबईच्या विकासाशी निगडित बाब असो वा मतदारांची कोणतीही अडचण असो, हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीचे कार्य अव्याहतपणे सुरू राहिले पाहिजे हा त्यांचा कायम आग्रह असतो.

राजकारणात आल्याने फक्त पैसा कमावला जातो, असा विचार करणारे लोक भारताशिवाय इतर कोणत्याही देशांमध्ये नसतील असे त्यांना वाटते. प्राध्यापक असोत वा उद्योगपती, राजकारणात आलेल्या लोकांना काही ना काही मिळतेच; आणि ते नम्रपणे समाजाला परत करत असतात. मंगलप्रभात लोढा म्हणतात की, १९९५ पासून आजपर्यंत राजकारणात कोणाकडूनही चुकीची अपेक्षा केलेली नाही. मी देशप्रेमाची भावना जागवून अखंडपणे चालत राहिलो. कधीही कोणतेही पद मागितले नाही. एकाच पक्षातून सलग विजयी झालेल्या आमदारांच्या यादीत मंगलप्रभात लोढा यांचे नाव ज्येष्ठतेच्या क्रमाने अग्रेसर आहे. आपल्या २८ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत भाजपच्या नेतृत्वाखालील अनेकवेळा सरकार स्थापन होऊनही, त्यांनी कधीही कोणत्याही पदाची लालसा दाखवली नाही. पक्षाच्या सूचनेनुसार ते काम करत राहिले. त्यांना गोवा, दिल्ली, आसाम, गुजरात, राजस्थान आणि कोलकाता येथे निवडणुकीवेळी पाठवण्यात आले. श्री. लोढा यांना तीन वर्षांपूर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष बनवण्यात आले. या तीन वर्षांत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधून प्रतिकूल परिस्थितीतही सातत्याने सामाजिक कार्य केले. कार्यकर्त्यांची चांगली फळी तयार करून शिवसेनेच्या दडपशाहीचा सामना तर केलाच शिवाय अविरत समाजसेवा करून देशासमोर एक वेगळी ओळख निर्माण केली. मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात अविरत काम केले.

मंगलजी म्हणतात की, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली मी देशसेवेचा संकल्प पूर्ण करेन. लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणतात की, आज मी जो काही आहे आणि ज्या उंचीवर पोहोचलो आहे, ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूल्यांनी मला या स्थानापर्यंत पोहोचवले आहे. ज्या समाजाने मला खूप मोठे केले आहे त्या समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. आता पक्षाने मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधा, करप्रणालीतील बदल, कौशल्य विकास प्रकल्प यासह अनेक मुद्द्यांवर काम करण्याचा संकल्प मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button