देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होणार नाही - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन आहे. देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात आलेला मुंबई -पुणे एक्सप्रेस वे, तसेच महामंडळामार्फत महाराष्ट्रात बांधण्यात आलेले वेगवेगळे उड्डाणपूल यामुळे महाराष्ट्राला एक गती मिळाली आहे. महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रस्त्यांचे जाळे निर्माण होणार आहेत. राज्यात सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने येणाऱ्या काळात इथेनॉल निर्मिती आणि इथेनॉलचा वापर करण्यावर भर यावर आपण लक्ष देणे गरजचे आहे. साखर उद्योगाचे महाराष्ट्रात मोठे योगदान आहे. इथेनॉलला येणाऱ्या काळात पेट्रोलच्या समान पातळीवरील ऊर्जाउत्पादक मूल्याचे इंधन म्हणून प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर वरळी सी लिंकला नरीमन पॉईट आणि विरारशी जोडणाऱ्या प्रकल्पाचे काम सध्या केंद्र शासनामार्फत सुरु असून हे काम महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाला चालना देणारे ठरणार आहे. दिल्ली- मुंबई महामार्ग बांधत असताना यातील 70 टक्के काम याच वर्षी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नरिमन पॉईट ते दिल्ली असा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल असे रस्ते बांधणे हे माझे स्वप्न आहे. हा महामार्ग जेएनपीटीपर्यंत जाणार असून याचे बहुतांश सर्व काम सुरु करण्यात आले आहे. दिल्ली आणि मुंबई शहरांना बंगळूरुशी जोडणारे आणि पुणे ते औरंगाबाद हे महामार्ग करण्याचे नियोजन सुरु असून राज्य शासनाने या महामार्गावरील जमिन अधिग्रहणाचे काम तत्काळ सुरु करावे असेही श्री. गडकरी म्हणाले.
मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील महाराष्ट्रामध्ये विविध प्रकल्प आणि योजना राबवित असताना आणि एकात्मिक प्रगती साध्य करीत असताना शेवटच्या घटकापर्यंत ही मदत पोहोचणे यावर भर देण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचे काम असेल किंवा महाराष्ट्रात आणि मुंबईत मेट्रो सेवा सुरु करणे, बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प सुरु केले तर मुंबई हा देशाशी जोडला जाण्यास महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्ग हा 700 किमी असून केवळ 9 महिन्यात राज्य शासनामार्फत जमिन अधिग्रहण करण्याचे काम सुरु करण्यात आले. येणाऱ्या काळात पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉल निर्मिती आणि वापर यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.