भारतमहाराष्ट्रमुंबई

जागतिक पातळीवरील शैक्षणिक उंची गाठण्यासाठी मुंबई विद्यापीठाने वाटचाल करावी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जागतिक पातळीवरील शैक्षणिक उंची गाठण्यासाठी मुंबई विद्यापीठाने वाटचाल करावी - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जागतिक पातळीवरील शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून शैक्षणिक उंची गाठण्यासाठी वाटचाल करण्याचा दृढ निश्चय मुंबई विद्यापीठाने केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील ग्रीन टेक्नॉलॉजी सभागृहात नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन, ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चार इमारतींचे उदघाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, जागतिक पातळीवर होणारे शैक्षणिक बदल यावर संशोधन करून भारताने वाटचाल करावी.भारतामध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच येथील संस्कृतीचे वेगळेपण आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय अनेक देशांनी मान्य केला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.विद्यापीठामध्ये कार्य करताना अडचणी आणि तक्रारी याकडे लक्ष न देता विद्यापीठासाठी आपण काय करतोय आणि विद्यापीठ आपल्याला काय देते याचा आपण विचार करून कार्य केले तर यश नक्कीच मिळेल, असेही राज्यपालांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठामध्ये अनेक नामवंत विद्यार्थी तयार झाले आहेत. विद्यापिठाचे नामवंत विद्यार्थी नोबेल पुरस्कारापर्यत पोहोचले पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे यासाठी सर्वांनी कार्य करावे असेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.कुलगुरू श्री.पेडणेकर म्हणाले, विद्यापीठासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन, ज्ञान स्रोत केंद्र (ग्रंथालय इमारत) मुलींचे वसतिगृह आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह या चार इमारतींचे उदघाटन करण्यात आले. भविष्यातील डिजिटल ग्रंथालयाचा अभ्यास करून अद्ययावत अशी ग्रंथालयाची इमारत उभारण्यात आली आहे. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही नवीन वसतीगृह इमारत बांधण्यात आली आहेत.

मुंबई विद्यापीठाची व्याप्ती मोठी असूनही सात जिल्ह्यांमध्ये आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोविडमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला परीक्षा वेळेत घेणे, निकाल वेळेत जाहीर करणे हे एक मोठे आव्हान विद्यापीठांसमोर होते. या काळात प्राध्यापक, कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले म्हणून हे शक्य झाले. जागतिक पातळीवरील शैक्षणिक बदल आणि काळाची गरज लक्षात घेऊन विद्यापीठांची शैक्षणिक वाटचाल झाली पाहिजे असेही श्री. पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.नवीन परीक्षा व प्रशासकीय भवन ही इमारत परीक्षा विभागासाठी बांधण्यात आली असून सात मजल्याची आहे. या इमारतीमध्ये कुलगुरू, प्र. कुलगुरू, संचालक यांचे कार्यालय असून परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालये असणार आहेत.

[ads4]

ज्ञानस्रोत केंद्र, ग्रंथालय भवन तळमजल्यासह दोन मजल्याची ही इमारत ग्रंथालयासाठी बांधण्यात आली आहे. पर्यावरण पूरक खेळती हवा असणारी अशी ही इको फ्रेंडली इमारत बांधण्यात आलेली आहे. हे ग्रंथालय भविष्यात डिजिटल ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल. मुलींचे वसतिगृह विद्यानगरी परिसरात सात मजल्याचे मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आले असून यामध्ये 72 खोल्या आहेत यात 144 विद्यार्थिनींची व्यवस्था केली जाणार आहे. या वसतिगृहात बहुउद्देशीय हॉल, ग्रंथालय, व्यायामशाळा, लॉन्ड्री, कॅन्टीन, टिव्ही रूम आदी सुविधा असतील. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह सहा मजली या वसतिगृहात एकूण 85 खोल्या असून यामध्ये 146 विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वसतिगृहात बहुउद्देशीय हॉल, ग्रंथालय, व्यायामशाळा, लॉन्ड्री, कॅन्टीन, टिव्ही रूम आदी सुविधा असतील.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button