वारंवार अतिवृष्टीमुळे लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता – भाजपा शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्तांची घेतली भेट
वारंवार अतिवृष्टीमुळे लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता - भाजपा शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्तांची घेतली भेट
———————————
श्रीश उपाध्याय/मुंबई
———————————
मुंबई, दि.०८ जुलै २०२२
मालाड (पूर्व), आंबेडकर नगर आणि पिंपरी पाडा वन खात्या अंतर्गत राहणाऱ्या रहिवाश्यांना वारंवार अतिवृष्टीमुळे मृत्युला समोर जावे लागते म्हणून त्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत भारतीय जनता पक्ष शिष्ठमंडळाने पक्षनेते विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांसोबत महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली. या शिष्ठमंडळात गटनेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक कमलेश यादव, राजेश्री शिरवडकर, रिटा मकवाना आदी उपस्थित होते.
दिनांक २ जुलै २०१९ मध्ये आंबेडकर नगर, पिंपरी पाडा येथे मालाड हिल जलाश्याची आर.सी.सी. भिंत कोसळल्याने ३२ नागरिकांचे प्राण गमावावे लागले आणि काही जण जखमी झाले. त्यावेळी प्रशासनाने १५५ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले होते. परंतु ८२ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले आणि ७३ झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. अतिवृष्टीमुळे लोकांच्या घरामध्ये डोंगरावरून पाण्या सोबत कचरा व माती गेल्यामुळे भांडी-कुंडी, कपडे, कागदपत्रे सारे काही वाहून गेले. वारंवार अतिवृष्टीमुळे लोकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकांचा जिवास धोका होण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने भाजपा शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. याबाबत महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवत येत्या चार दिवसांत सदर नागरिकांना पर्यायी घरे देण्याचे आश्वासन दिले. याबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत भाजपा पक्षनेते विनोद मिश्रा व भाजपा शिष्ठ मंडळाचे आभार मानले.