आपत्ती कालावधीत शासनाच्या सर्व प्रसिद्धी आणि जनसंपर्क यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – संचालक गणेश रामदासी
आपत्ती कालावधीत शासनाच्या सर्व प्रसिद्धी आणि जनसंपर्क यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - संचालक गणेश रामदासी
मुंबई, दि. 10 : शासनाच्या सर्व प्रसिध्दी आणि जनसंपर्क यंत्रणांनी आपत्तीच्या कालावधीत समन्वयाने काम करावे. माहितीचे प्रसारण आणि संदेश देवाण घेवाण जलदगतीने होण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गणेश रामदासी यांनी केले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात आयोजित शासनाच्या विविध जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक गोविंद अहंकारी, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महानगरपालिका, म्हाडा, एम.टी.एन.एल., बेस्ट, अदानी एनर्जी, एस.टी.महामंडळ, पीआयबी, दूरदर्शन, आकाशवाणी, संरक्षण, सिडको, एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया, पश्चिम रेल्वे या यंत्रणांचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते.
श्री.रामदासी म्हणाले, जुलै 2021 मध्ये आपत्तीच्या कालावधीत राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मंत्रालय नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पूर परिस्थीतीचा आढावा घेवून तत्काळ मदतीसाठी सर्व यंत्रणांना निर्देशही दिले होते. यावेळी मंत्रालय नियंत्रण कक्षातून सर्व माध्यमांना देण्यात येणाऱ्या माहितीचे समन्वय देखील माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून सुयोग्यरित्या होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आपत्ती कालावधीतही माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी समाज माध्यमे ही अत्यंत प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रात येणारी माहिती परस्परांशी संवाद साधून देण्याबरोबरच आपल्या विभागाच्या समाज माध्यमांवर अद्ययावत करावी, जेणेकरून सर्व यंत्रणांनाही माहिती कमी वेळेत मिळेल. कम्युनिटी रेडिओ हे देखील सध्याच्या काळात प्रसिध्दीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यासाठी सागर तटीय क्षेत्रात शासनातर्फे शासकीय, निमशासकीय संस्था, विद्यापीठ इत्यादींना प्रोत्साहित केले जात आहे त्याचा लाभ संबधितांनी घ्यावा, असे श्री. रामदासी म्हणाले.
यावेळी सर्व जनसंपर्क अधिकारी यांनी त्यांच्या विभागातंर्गत जनसंपर्कासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.समाज माध्यमे, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीया तसेच इतर माध्यमातून केली जाणारी प्रसिद्धी, विभागाचे अद्यावत नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन नंबर, तसेच जनतेच्या हितासाठी तत्काळ दिली जाणारी माहिती याबाबत सादरीकरण केले तसेच सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाने आपत्ती कालावधीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची खात्रीशीर व अद्यावत माहिती समाज माध्यमांवर प्रसिद्ध करावी, याबाबतही सर्वांनी आपले मत व्यक्त केले. आपत्ती कालावधीत प्रत्येक यंत्रणांचा वेगळा क्रमांक असल्यामुळे जनतेला मदत मागताना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व यंत्रणांचा मिळून एकच हेल्पलाईन क्रमांक असावा, अशी सूचना यावेळी सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक श्री.अहंकारी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.