भारतमहाराष्ट्रमुंबई

महाआयडी, गोल्डन रेकॉर्ड उपक्रम यशस्वी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाआयडी, गोल्डन रेकॉर्ड उपक्रम यशस्वी करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशात आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. प्रशासनातील माहिती तंत्रज्ञानाच्या वापरात देखील महाराष्ट्र अव्वल असला पाहिजे. यासाठी महाआयटीच्या माध्यमातून महाआयडी, गोल्डन रेकॉर्ड यासारख्या उपक्रमांना मूर्त स्वरूप देऊन हे उपक्रम यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले. योजनेच्या लाभार्थींना वेळेत सुविधा मिळण्यासाठी, लाभार्थींची निवड करण्यासाठी, सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी, प्रत्येकाची अधिकृत ओळख मिळण्यासाठी महाआयडी, गोल्डन रेकॉर्ड उपक्रम उपयुक्त ठरतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, प्रशासन लोकाभिमुख, गतीमान, पारदर्शक होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करावा. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सोयी, सुविधा, सेवा मिळतील. कोणत्याही योजनेच्या लाभार्थींना वेळेत सुविधा मिळण्यासाठी, लाभार्थींची निवड करण्यासाठी, सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी, प्रत्येकाची अधिकृत ओळख मिळण्यासाठी महाआयडी, गोल्डन रेकॉर्ड उपक्रम उपयुक्त ठरतील. यासाठी सचिव स्तरावरून डेटा बेस उपलब्ध करून घ्यावा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या ऑनलाईन सेवा-सुविधा देखील उपलब्ध कराव्यात, या सेवा-सुविधा अधिक सक्षम कराव्यात, ऑनलाईन सर्व्हिसेसवर भर द्यावा, सर्वांना सहज सेवा-सुविधा मिळण्यासाठी क्यूआर कोडच्या वापरावर भर द्यावा, आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महानेट जितके प्रभावी होईल तितकी संपर्क यंत्रणा सशक्त होणार आहे. त्यामुळे महानेटचे जाळे विस्तारले पाहिजे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे कामकाज लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सर्व उपक्रमांना अधिक परिणामकारक करावे, हे उपक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाआयटी, सीटीझन सर्व्हीस, प्रॉडक्टायजेशन, स्कीलींग, सीएमओ, रिस्ट्रक्चरिंग ऑफ महाआयटी, सर्व्हिस टू डिपार्टमेंट आदींचा यावेळी आढावा घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button