मिरा-भाईंदरच्या पाणी पुरवठ्याबाबत आठवड्यात आवश्यक उपाययोजना कराव्यात – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मिरा-भाईंदरच्या पाणी पुरवठ्याबाबत आठवड्यात आवश्यक उपाययोजना कराव्यात - जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई, मिरा भाईंदर महानगरपालिकेतील भागांना पाणी पुरवठा करण्यासाठी आठ दिवसांच्या आत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिली.
मिरा भाईंदर महानगरपालिकेस मुंबई महापालिकेकडून दररोज १.५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस आमदार गीता जैन, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, सचिव विलास राजपूत, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले आदी उपस्थित होते.
मिरा भाईंदर महानगरपालिकेला पाणी देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. दहिसर चेक नाका ते म्हाडा संकुलपर्यंत जलवाहिनीचे काम मिरा भाईंदर महानगरपालिकेने पूर्ण केले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका आणि मुंबई महापालिकेच्या वाहिनीची आंतरजोडणी पूर्ण झाली आहे. मात्र अद्यापही पाणीपुरवठा सुरू झाला नाही, असे आमदार गीता जैन यांनी सांगितले.
यावर सदरच्या जलवाहिनीची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही तांत्रिक कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी काही कालावधी लागेल, असे बैठकीत सांगण्यात आले.
यावर पाणी देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तांत्रिक बाबी तपासून त्यावर योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री.पाटील यांनी दिल्या.
यावेळी मुंबई महापालिका उपायुक्त बी. एम. राठोड, जल अभियंता संजय आयते आदी उपस्थित होते.