दावोस जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र शासनासोबत ३० हजार कोटींचे सामंजस्य करार
राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार - सुभाष देसाई
दावोस, स्वित्झर्लंड, जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
२३ मे रोजी झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टिल, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.
दावोस येथील महाराष्ट्र लाउंजमध्ये एकूण ३०,३७९ कोटी रुपयांच्या गुंतवणुक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामुळे महाराष्ट्रात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणारा असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
राज्याच्या अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत एकूण १० आवृत्या आयोजित करण्यात आल्या असून, त्यामाध्यमातून आजतगायत १२१ सामंजस्य करार झाले. त्यातून राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार आहे.
विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.
आज झालेले काही महत्वाचे सामंजस्य करार
· इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड या सारख्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार आहे.
· जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनींपैकी एक मायक्रोसॉफ्ट पुण्यात डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी रक्कम ३२०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
· इंडोनेशियातील एक अग्रगण्य लगदा आणि कागद उत्पादक कंपनी आशिया पल्प अँड पेपर (एपीपी) ची संस्था सिनर्मास पल्प अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
· हॅवमोर आइसक्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड पुण्यात आइस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करत असल्याने फूड अँड अॅग्रो प्रोसेसिंगलाही वाव मिळणार आहे. सोनई इटेबल आणि गोयल प्रोटिन्स तेल कंपन्यांचा समावेश आहे.