मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता अडविणार अनिल गलगली यांस महापालिकेची माहिती
मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता अडविणार अनिल गलगली यांस महापालिकेची माहिती
26 जुलै 2005 पासून आजमितीस मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली 1150 कोटी खर्च केले पण तरीही मिठी साफ होईना कारण आजही सांडपाणी, रासायनिक
सांडपाणी नदीत बिनधास्त सोडले जात आहे. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी आता अडविले जाणार असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस पालिकेने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिठी नदीमध्ये दोन्ही बाजुकडून उत्सर्जीत होणाऱ्या सांडपाणी बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांसकडे तक्रार केली होती. याबाबत पर्जन्य जल वाहिनी विभागाचे उप प्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी अनिल गलगली यांस कळविले की मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सुचविली आहेत. सल्लागाराने सुचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत, गट क्र. 1 अंतर्गत, फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते मिठी किना-यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड येथे प्रस्तावित ८ द.ल.घ.ली. एवढया क्षमतेच्या मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रीया करण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून माहे मे 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
पुढे अशी माहिती दिली की सल्लागाराने सुचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र. 2 अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोटया नाल्यामधून मिठी नदी मध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे ई. कामांचा अंतर्भाव आहे. सदर कामे प्रगतीपथावर असून माहे डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. गट क्र. 3 अंतर्गत भरती प्रवण क्षेत्रातील मिठी नदी व वाकोला नदीत विविध पातमुखांद्वारे उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदी व वाकोला नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे, फ्लड गेट बांधणे, उदंचन पंप बांधणे, प्रामनेड बांधणे ई. कामांचा प्रादूर्भाव आहे. सदर कामाची निविदा प्रकिया प्रगतीपथावर आहे. गट क्र. 4 अंतर्गत मुख्यतः मरोळ-बापट नाला व सफेद पूल नाला या दोन पातमुखांद्वारे मिठी नदी मध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते धारावी स्थित सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यंत बोगदयाद्वारे वळविण्याचे काम अंतर्भूत आहे. सदर काम प्रगतीपथावर असून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
साकीनाका येथील लाठिया रबर रोड वरील रेडिमिक्स कंपनीवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एल पालिकेस कळविण्यात आले आहे.
अनिल गलगली यांच्या मते हेच काम सुरुवातीला केले गेले असते तर निश्चितपणे आज खर्च करण्यात आलेल्या पैश्यांचे चीज झाले असते. आता ही कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.