वैज्ञानिकांनी कृषी क्रांतीच्या माध्यमातून देशाला जगद्गुरू करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 24 वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न
शेती हा भारतीय लोकांच्या जीवनाचा आधार आहे. एकेकाळी इतर देशातून निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य आयात करावा लागणारा आपला देश आज अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला आहे. हरित क्रांती व श्वेत क्रांती नंतर आज नील क्रांतीच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरु आहे. कृषी वैज्ञानिक व कृषी विद्यापीठांनी यापुढे संशोधन कार्य वाढवावे व देशाला जगद्गुरू बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा 24 वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केल्याबद्दल देश कृषी विद्यापीठांचे योगदान कधीही विसरणार नाही. असे सांगताना संकटात असलेल्या देशांना देखील अन्नधान्य पुरविण्याची क्षमता देशाला प्रदान केल्याबद्दल राज्यपालांनी कृषी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.
परभणी येथील कृषी विद्यापीठाला भेट दिली त्यावेळी विद्यापीठाने विकसित केलेले रोबो तंत्रज्ञान, ड्रोन तसेच विविध वाणांच्या विकासाचे कार्य पाहिले. कृषी स्नातकांनी प्रशासकीय सेवेत जाण्याऐवजी आपल्या क्षेत्रातच अर्जित ज्ञानाचा उपयोग करावा असे आवाहन करताना जगभरात कृषी, दुग्ध व्यवसाय आदी क्षेत्रातील कृषी तज्ज्ञांची मोठी मागणी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुशाखीय अध्ययनास चालना देण्यात आली असल्याचे सांगताना कृषी स्नातकांनी आपल्या आवडीच्या इतर विषयांचे देखील ज्ञान ग्रहण करून आपले व्यक्तिमत्व विविधांगी घडवावे असे त्यांनी सांगितले.
यंदापासून महिला शेतकऱ्यांचा सन्मान करणार
– कृषिमंत्री दादाजी भुसे
शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान फार मोठे आहे. कृषी विद्यापीठांमध्ये देखील महिला विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे असे नमूद करून सन 2022 या वर्षांपासून शासनातर्फे महिला शेतकऱ्यांचा देखील सन्मान केला जाईल अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दीक्षांत समारोहात प्रत्यक्ष सहभागी होताना दिली.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रमाणात सर्व सुविधायुक्त वसतिगृहे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील युवा शास्त्रज्ञांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगताना शेती या विषयाचा समावेश शालेय शिक्षणात करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय सुरु असल्याचे श्री. भुसे यांनी सांगितले. कृषी पदवीधरांनी उत्तम शेती करून आदर्श निर्माण करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दीक्षांत समारंभात उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नरेंद्रसिंह राठौर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अशोक ढवण, इतर कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्थापनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी दीक्षांत सभागृहाचे यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.
दीक्षांत समारोहात ४२३२ स्नातकांना पदव्या, पदव्युत्तर पदव्या तसेच पीएच. डी. प्रदान करण्यात आल्या तसेच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तसेच रोख पारितोषिके देण्यात आली.