बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात – नाना पटोले

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या वकील सदावर्तेचा बोलविता धनी कोण?

प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाची ३ जानेवारीपासून ‘ओबीसी जगजागरण यात्रा’.

मुंबई, दि. २६ ऑक्टोबर

महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मागील दीड वर्षात राज्यातील भाजपा सरकार दिल्लीच्या आदेशानुसार महाराष्ट्राची लूट करत आहे. सुरतमध्ये मोठा हिरे उद्योग उभा केला जात आहे, त्यासाठी मुंबईतील हिरे उद्योगही सुरतला नेण्यासाठी तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान मोदी आले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प हा महाराष्ट्रावर मोठे ओझे आहे पण मोदी-शहा समोर शिंदे-फडणवीस-पवार काहीच बोलू शकत नाहीत. मुंबई व महाराष्ट्रातील उद्योग, महत्वाची कार्यालये, संस्था मुंबई, महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचे सपाटा भाजपाने लावलेला आहे. राज्याला रसातळला घालवण्याचे पाप भाजपा सरकार करत आहे.

मराठा आरक्षण प्रश्नावर एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन समाजाची फसवणूक करत आहेत तर दुसरीकडे सदावर्ते नावाचा वकील मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, त्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार अशी जाहीर दर्पोक्ती करत आहे. या सदावर्तेचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहित आहे. याआधीही सदावर्तेनी विविध मुद्द्यांवर भाजपाधार्जिणी भूमिका घेतलेली आपण पाहिले आहे. सदावर्ते हा फडणवीस यांनी दिलेली भूमिका मांडत असतो. यावरून मराठा आरक्षणाला कोणाचा विरोध आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद कोण उभा करत आहे हे स्पष्ट होते. राहुल गांधी यांनी मांडलेली जातनिहाय जनगणनेची मागणी मान्य झाली तर आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

ओबीसी जनजागरण यात्रा..
केंद्रातील मोदी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. जातनिहाय जनगणनेलाही मोदी सरकारचा विरोध आहे. हे सरकार जातनिहाय जनगणनाही करत नाही आणि डॉ. मनमोहनसिंह सरकारने केलेली जनगणनाही जाहीर करत नाही. मागास समाजांना आणखी कमजोर करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. राहुल गांधी यांनी मांडलेली जातनिहाय जनगणनेची भूमिका राज्यातील जनतेसमोर मांडण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचा ओबीसी विभाग ३ जानेवारीपासून राज्यात ओबीसी जनजागरण यात्रा काढणार आहे. ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काढली जाणार आहे.

सुतळी खरेदीमध्येही भ्रष्टाचार..
राज्यातील शिंदे प्रणित भाजपा सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता या सरकारने सुतळी खरेदीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. बाजारात ७२ रुपये किलो दराने मिळणारी सुतळी या सरकारने ४१० रुपये किलो दराने खरेदी करुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. किमती वाढवून टेंडर देण्यासाठी निर्मल भवनमध्ये लुटारु बसले आहेत. जनतेच्या घामाचा पैशाची दिवसाढवळ्या लुट सुरु आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, ड्रग माफिया, दरोडेखोर, महिला अत्याचार वाढले आहेत पण सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे असेही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button