बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामे तातडीने मार्गी लावावीत

क्रीडा व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

मुंबई,

आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडा व बंदरे विभागाची विविध विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश क्रीडा, युवक कल्याण व बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयातील दालनात रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मंत्री श्री. बनसोडे यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला बंदरे विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन, राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, तसेच आमदार श्री. दळवी, किरण सामंत उपस्थित होते.

भगवती क्रूझ टर्मिनल विकास प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाली असून प्रस्ताव नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची मान्यता मिळाल्यामुळे वित्त विभागाच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. राजीवाडा खाडीतील गाळ काढण्याच्या कामाबाबत मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर बंदर जोड रस्ते, जेट्टी दुरुस्ती, कुरणवाडी जेट्टी ते मांडवा रस्ता तयार करणे आदी कामांच्या तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मान्यता मिळताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल असे अतिरिक्त मुख्य सचिव पराग जैन यांनी सांगितले.

रत्नागिरीत अद्यावत क्रीडा संकुल उभारावे

रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळे एमआयडीसी येथे जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधा निर्मितीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असून रत्नागिरी जिल्ह्यात अद्ययावत व दर्जेदार क्रीडा संकुल उभारावे. येथील क्रीडापटुंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील अशारितीने काम करावे, अशा सूचना मंत्री श्री. बनसोडे यांनी क्रीडा विभागाला दिल्या.

संकुलातील उपहारगृह, प्रसाधनगृह, चेंजिग क्यूबिकल्स, कार्यालय इमारत, वसतिगृहाचे जोत्यापर्यंतचे काम पूर्ण झाले असून त्यावर चार कोटी ६१ लक्ष ९० हजार रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील खुले प्रेक्षागृह, ४०० मीटर धावनपथ, प्रेक्षकांसाठी गॅलरी, फुटबॉल आर्टिफिशियल टर्फ मैदान, ड्रेनेज बांधकाम, इनडोर हॉल, मुला मुलींचे वसतिगृह, क्रीडा संकुलातील अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, मुख्य गेट, वॉचमन कॅबिन, इत्यादी उर्वरित कामांकरिता २० कोटी १६ लक्ष ३० हजार रुपयांचे सुधारित अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यात आले असून पूर्वीचे ७ कोटी ४० लक्ष असे दोन्ही मिळून २७ कोटी ५६ लक्ष रुपयांच्या कामास क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी लवकरच वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर एनसीसी भवन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. यासाठी ६३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असून याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यावर पंधरा कोटी खर्च झालेला आहे. उर्वरित कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असेही मंत्री श्री. बनसोडे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button