‘लाईट अँड साऊंड शो’ चालवता येत नाही ते महाराष्ट्र काय चालवणार? : अतुल लोंढे
भाजपा सरकारच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित राहिला नाही.
मुंबई, दि. १९ जानेवारी
भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे महाराष्ट्राची अधोगती होत आहे. भाजपा सरकारच्या नाकाखालून मोठे उद्योग राज्याबाहेर जात आहेत, शेतकऱ्यांकडे लक्ष दिले जात नाही, पेपर फुटत आहेत, बेरोजगारी प्रचंड असून नोकर भरती केली जात नाही, १०० पैकी ८८ लोक नोकरी शोधत आहेत. सरकार चालवण्यास भारतीय जनता पक्ष सक्षम नाही. गिरगाव चौपाटीवरच्या लोकमान्य टिळक उद्यानातील साधा ‘लाईट अँड साऊंड शो’ चालवण्याची यांची क्षमता नाही ते महाराष्ट्र काय चालवणार? असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला केला आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी भाजपा ऐनकेनप्रकारे प्रयत्न करत आहे, त्याचाच एक भाग म्हणून गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक उद्यानात प्रभू रामचंद्राचा जीवनपट दाखवण्यासाठी ‘लाईट अँड साऊंड शो’ आयोजित करण्यात आला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित हा शो होणार होता, हा कार्यक्रम झाला, लोढांची चमकोगिरी झाली पण ‘लाईट अँड साऊंड शो’ मात्र काही झाला नाही, लोकांची घोर निराश झाली. भाजपाला साधा ‘लाईट अँड साऊंड शो’, चालवता येत नाही यातूनच त्यांची क्षमता स्पष्ट होते, असे अतुल लोंढे म्हणाले.