राज्यातील धार्मिक स्थळांच्या, शहरालगतच्या ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महिला सशक्तीकरण अभियान, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान प्रभावीपणे राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई दि. 15 :- राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारी ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबविण्याची आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेची बाब आपणासाठी अभिमानाची असून त्याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, शहरी आणि ग्रामीण भागातील संपूर्ण स्वच्छता मोहिम आणि महिला सशक्तीकरण अभियान यांच्याविषयीची आढावा बैठक वर्षा शासकीय निवासस्थान येथे झाली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह, विविध विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील धार्मिक स्थळांवरील इमारतींची स्वच्छता संबधित ट्रस्टमार्फत होत असते. परंतु बाहेरील भागात अस्वच्छता कायम राहते. यामुळे भाविकांना त्रास होत असतो. याची गंभीर दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात तातडीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहिम राबवावी. तसेच मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. आठवडाभरात हा बदल दिसायला हवा. तसेच धार्मिक स्थळांवर कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष योजना तयार करण्याच्या आणि या योजनेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. या योजनेसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून नोडल अधिकारी नेमून राज्यस्तरावरुन लक्ष ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शहराबरोबरच ग्रामीण भागाच्या स्वच्छतेसाठी अभियान
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपल्या राज्याला स्वच्छता अभियानात देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. हा क्रमांक आपल्या राज्याला कायम ठेवायचा आहे. यात संपूर्ण स्वच्छता मोहिम महत्वाची ठरणार आहे. राज्यातील शहरी भागात संपूर्ण स्वच्छता मोहिम आपण राबवत आहोत. या मोहिमेद्वारे एकाच वेळी जादा मनुष्यबळ आणि संसाधने वापरून स्वच्छता करण्यात येत आहे. यामुळे प्रदूषणासोबतच रोगराई सुद्धा कमी होत असून या मोहिमेला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. यासाठी नगरविकास विभागातर्फे नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करुन लक्ष ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण स्वच्छता अभियानात सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे तेव्हा त्यांच्याकडून अधिक चांगले काम होणार आहे, या मोहिमेचे ते खरे हिरो ठरले आहेत, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.
राज्यात ही स्वच्छता केवळ शहरी भागापूरती मर्यादित राहायला नको. यासाठी शहराच्या हद्दीलगत तसेच ग्रामीण भागात देखील स्वच्छता मोहिम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या भागांच्या स्वच्छतेसाठी देखील कायमस्वरुपी योजना राबविण्याचे आणि जिल्हा नियोजन समिती माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी संपूर्ण स्वच्छता मोहिमेविषयी थोडक्यात माहिती दिली.