बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पट पृथ्वीबाबांनी उलगडला आणि सभागृह थक्क झाले

तंत्रज्ञानामुळे बदलत्या भविष्याचा वेध ऐकून श्रोते स्मितीत...

कराड
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाची पत्रकारसृष्टीत चर्चा आहे. गेल्या वर्षा दोन वर्षात आलेले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय, कृत्रिम बुद्धिमत्ता), चॅटजीपीटी आणि डीप फेक तंत्रज्ञानाचा प्रसारमाध्यमांसह विविध क्षेत्रावर झालेल्या परिणामांचा पट उलगडून दाखवला आणि उपस्थित अवाप् झाले.

कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहामध्ये पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे यांची पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ‘प्रसार माध्यमे : सद्यस्थिती’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी अध्यक्षस्थानी होते तर कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या तासाभराच्या भाषणात दोन टप्प्यात प्रसारमाध्यमांपुढील आव्हाने विषद केली. पहिल्या टप्प्यात वृत्तपत्रे, त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या अडचणी, कार्पोरेट जगताचा शिरकाव, सरकारचा दबाव स्पष्ट करताना वाचकांनीच वृत्तपत्रे जीवंत ठेवली पाहिजेत, असे सांगितले.

दुसऱया भागात त्यांनी आपल्या आवडीच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या विषयाला हात घातला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने येत्या काळात न्यूज चॅनेल्सवरील अँकरचा रोजगार संपुष्टात येईल, असे ते म्हणाले. एआयमुळे कृत्रिम पद्धतीने बातम्या सांगणारे अँकर खऱया अँकरची जागा घेतील. याची सुरूवात झाल्याचे त्यांनी सांगितले. एआयमुळे रोजगार नष्ट होणार आहेत पण किती प्रमाणात नष्ट होणार आहेत. आता जगात चालक विरहित कार सुरू झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशा कारना देशात परवानगी देणार नाही, असे सांगितले आहे. कारण अशी परवानगी दिली तर देशातील 80 लाख चालकांवर बेरोजगार होण्याची भीती आहे, असे ते म्हणाले. केवळ आवाजाच्या आधारे मजकूर टाईप करण्याची सुविधा निर्माण झाल्याचे सांगत यामुळे टाईपरायटरचा रोजगार संपुष्टात आला आहे.

चॅटजीपीटी अजून इंग्रजीत आहे. मराठीत आलेले नाही. परंतु रजेचा अर्ज लिहण्यापासून अनेक बाबी व्याकरणदृष्टय़ा शुद्ध पद्धतीने ते पुरवत आहे. डीप फेक तंत्रज्ञानामुळे जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच इंग्लडच्या पंतप्रधानांनी याबाबत जगातील राष्ट्रप्रमुखांना यावर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. या तंत्रज्ञानामुळे सत्य आणि असत्याची सीमारेषा धूसर झाली आहे, असे ते म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण हे स्वत: सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तंत्रज्ञान हा त्यांचा आवडीचा विषय. त्यामुळे त्यांनी अगदी हुकमी पद्धतीने याचे विश्लेषण केले. ते ऐकताना सभागृहात पीन ड्रॉप सायलेन्स होता. मोबाईलची रिंगही वाजली नाही. जागचे कोणी उठले नाही. भाषण जसजसे रंगात आले, तसे काही तरी नवीन आपण ऐकतोय. एका नव्या विश्वाची सफर करतोय, असे सर्वांना वाटले. पत्रकारांबाबत काळजीचा सूर व्यक्त करताना तुम्ही तंत्रज्ञानाने अपडेट राहा. मी फक्त प्राथमिक स्तरावर तुम्हाला अवगत केलंय. आपण मुंबईतून एखाद्या या विषयातील तज्ञाला बोलावून पत्रकारांचे प्रबोधन करू, असे सांगायला ते विसरले नाहीत.
बाबांचे भाषण संपत असताना अजितराव पाटील चिखलीकर यांनी उभे राहून, यानंतर आरक्षण आणि सद्यस्थिती या विषयावर तुम्ही एखादे सेशन घ्या. त्यास सर्वपक्षियांना बोलावू. नेमकी परिस्थिती सर्वांना समजली पाहिजे, असे सांगितले.
सुभाषराव जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात बाबांच्या भाषणाची प्रशंसा केली. कसलाही राजकीय अभिनिवेष न बाळगता बाबांनी भाषण केले. लोकांना शंका असते की, पृथ्वीराज बाबा बोलणार म्हटले की, आजचं सरकार, कालचं सरकार, पत्रकारांची गळचेपी या विषयावर बोलतील. पण ते बोलले तर काँग्रेसबद्दल बोलले. हा ज्ञानाधिष्ठित, विज्ञानपूर्वक बोलले. या विषयाची निरनिराळय़ा अंगाने त्यांनी माहिती दिली. जगात काय चालले आहे. काय होईल, याचा अंदाज आपल्याला आला. सामान्य माणसाच्या जीवनावर याचा परिणाम होणार आहे. भविष्यात काय होईल, हेही आपणास सांगता येणार नाही. अशा परिस्थितीत संभ्रमावस्था निर्माण होते. चॅटजीपीटीमध्ये हे उसने घेतले का, कुणाची कॉपी केली का? हेही तपासतात. विज्ञान पुढे पुढे चालले आहे. माहित नाही, पुढे काय होणार आहे. एकावर एक विज्ञानाच्या पायऱया आहेत. परमेश्वर आपल्याला आपल्या हयातीत व्यवस्थित ठेवेल. जेवढे पटतंय तेवढे समाधानकारक जगता येईल, अशी अपेक्षा करूया. बाबांच्या भाषणात पत्रकारितेतील वेगळे पैलू त्यांनी उलगडून दाखवले. आज चांगले भाषण ऐकायला मिळाले. भविष्यकाळ बघायला मिळाला. जे कुणी लिहणार नाही. ऐकायला मिळणार नाही. ते बाबांच्या भाषणातून ऐकायला मिळाले, याचा आनंद व्यक्त करतो.

आभार मानताना पत्रकार प्रमोद तोडकर यांनी चुणूक दाखवली. ते म्हणाले, प्रसारमाध्यमांमधील बदलते तंत्रज्ञान, चॅटजीपीटीबद्धल बाबांनी सांगितले. ते ऐकून सभागृहातील सर्वजण चॅट पडले असतील. दर्पणकारांच्या जयंतीच्या निमित्ताने दर्पणच जर खोटे बोलायला लागले तर समाजाचा घात होणार आहे, ही भीती बाबांनी व्यक्त केली. डीप फेक, चॅटजीपीटी हा विषय आपल्या आवाक्याबाहेरचा आहे. या माहोलात जात, धर्म, पक्षाच्या बंधनात न अडकता सत्यमेव जयतेची पाठराखण समाजाने केली पाहिजे. गर्दीपेक्षा दर्दी श्रोत्यांना भविष्याचे गांभीर्य समजले आहे. पत्रकार पेड पीआर एजन्सी होऊ नयेत, यासाठी समाजाने पत्रकारितेला पाठबळ दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमानंतर समाजातील विविध पदाधिकारी व नागरिकांनी बाबांना भेटून त्यांच्या भाषणाचे कौतुक केले. पत्रकारही मीडिया क्षेत्रातील विशेषत: प्रिंट माध्यमातील संक्रमणावर चर्चा करत होते. संयोजकांनी खऱया अर्थाने वेगळय़ा विषयावर चर्चा घडवून प्रबोधन केल्याचे सांगत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button