तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहेत
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला संताप
मुंबई
तलाठी भरती घोटाळ्याबाबत सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. स्पर्धा परीक्षेदरम्यान सातत्याने होत असलेली पेपर फुटी, भ्रष्टाचार यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत आपल्या एक्स हँडलवर बोलताना ते म्हणालेत की, नुकताच तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला. २०० गुणांच्या परीक्षेत त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याची किमया झाली आहे. कसे झाले? यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकायला हवा.
शासकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पेपरफुटीला कारणीभूत असलेले दलाल आपली पोळी भाजून घेत आहेत. “जर तर”ची भाषा करत सत्तेतील जबाबदार व्यक्ती नाममात्र राहण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील तरुण पिढीची अवस्था दयनीय करत, भावी प्रशासकीय यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा त्यांनी दिला
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत क आणि ड गटातील पदभरतीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करावी, अशी मागणी मी यापूर्वीच केली होती. पण अजून त्याबाबत काही कार्यवाही झाली नाही. सरकार या विषयासाठी गंभीर नाही हेच दिसते आहे. या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असेही ते म्हणाले .