कळमनुरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामधील शाळांमध्ये सोयीसुविधांची पुनःतपासणी
मंत्री डॉ. विजयकुमार गावित
नागपूर,
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी नामांकित शाळा योजना राबविण्यात येते. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामधील शाळांमध्ये सोयीसुविधेच्या अनुषंगाने पुनःतपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी विधानपरिषदेत दिली.
कळमनुरी कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी नामांकित शाळा योजना संदर्भात सदस्या प्रज्ञा सातव यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देतांना मंत्री डॉ. गावित म्हणाले की, हिंगोली या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील हायटेक इंग्लिश स्कूल, एरंडेश्वर तसेच सोनपेठ तालुक्यातील व्हिजन पब्लिक स्कूल, सोनपेठ व इतर चार अशा एकूण ६ इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळा कार्यरत आहेत. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये हायटेक इंग्लिश स्कूल, एरंडेश्वर या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेवर उपलब्ध सोयीसुविधांच्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला व व्हिजन पब्लिक स्कूल, सोनपेठ या शाळेची सहायक आयुक्त (प्रशासन), आदिवासी विकास अमरावती यांच्यामार्फत तपासणी करण्यात आली आहे.
पुनःतपासणीत हायटेक इंग्लिश स्कूल, एरंडेश्वर ता. पूर्णा जि.परभणी, व्हिजन पब्लिक स्कूल सोनपेठ, जि. परभणी व इतर 4 इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेची मान्यता कायम ठेऊन सदर शाळांना १ ली व २ री मध्ये प्रवेशाकरिता ५० नवीन विद्यार्थी वाटप करण्यात आले असल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.
प्रकल्प अधिकारी कळमनुरी या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गार्डन हिल्स इंग्लिश स्कूल, कळमनुरी, जि. हिंगोली या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेची मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे या शाळेतील ५५ विद्यार्थ्यांचे समायोजन हायटेक इंग्लिश स्कूल, एरंडेश्वर ता. पूर्णा जि. परभणी येथे करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य सर्वश्री आमश्या पाडवी, गोपीचंद पडळकर, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला होता.